कोल्हापूर : शरद पवार यांच्या कुटुंबीयांनी २३ साखर कारखाने घशात घातले आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. नांदणी (ता.शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. शेट्टी म्हणाले, साखर कारखानदारांचे नेते हे शरद पवार आहेत. दुसरीकडे तेच उसाचे दर ठरवणार. सगळय़ात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. तरीही ते ऊस उत्पादक शेतकरी आळशी आहे,असे म्हणणार. खरे तर पवार कुटुंबीय तुम्हीच शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित तर अधिक शहाणा निघाला. कन्नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. असे रोहित शेतकऱ्यांच्या घरात जन्माला यावेत, असा टोला त्यांनी लगावला. एकरकमी एफआरपी व दिवसा वीज मिळण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावणार आहे. यासाठी न्यायालयात जाणार आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे तर शिल्लक साखरेवर नाबार्डकडून कर्ज का देत नाही. नाबार्डने थेट कर्ज पुरवावे यासाठी थोडे जरी प्रयत्न केले तरी शेतकरी सुखी होईल, अशी टीका त्यांनी केली. स्वागत तानाजी वठारे तर प्रास्ताविक सागर संभुशेटे यांनी केले. त्यांनी नांदणीतून दोन लाखाचा निधी संघटनेला दिला. माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक अजित पोवार, सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, रामचंद्र शिंदे, प्रकाश परीट, युनुस पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.