कोल्हापूर : गत हंगामातील ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी झालेल्या ऊस आंदोलनादरम्यान सन २२ -२३ या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ठरल्याप्रमाणे प्रतिटन १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता देण्याचे प्रस्ताव कारखान्यांनी शासनाकडे सादर केलेले असून या प्रस्तावांना मान्यता देवून ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन केली.

हेही वाचा – संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची शिरोळ, इचलकरंजीत पाहणी

हेही वाचा – अखेर इचलकरंजीतील अतिक्रमणांवर हातोडा; मोहीम कठोरपणे राबवण्याची मागणी

याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची दाहक परिस्थिती निर्माण झालेली असून पावसाळा तोंडावर आला तरी याबाबत शासनाने पिकाचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. विशेषत: शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यातील डोंगरी भागातील ऊसासह अन्य पिके पाण्याविना करपली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. अनेक तालुक्यांतील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की मी ठरल्याप्रमाणे आचारसहिंता संपल्यानंतर मुख्य सचिव यांना भेटून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर तातडीने सदर प्रस्तावांना मान्यता देवून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला असून संबधित विभागास ऊपाययोजनाबाबत सूचना दिल्या असल्याचे सांगितले.