‘पर्ल्स’मधील गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच मिळणार

पर्ल्स गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचे येथे आयोजन केले होते.

‘सेबी’च्या कारवाईमुळे परतावा शक्य

पर्ल्स (पीएसीएल) कंपनीमध्ये देशभरातील ६ कोटी व राज्यातील १ कोटी गुंतवणूकदारांनी  गुंतवणूक केलेली आहे. देशात ५० हजार कोटी, तर राज्यात १५ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूक केलेली रक्कम सेबीने केलेल्या कारवाईमुळे परत मिळणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पर्ल्स (पीएसीएल) गुंतवणूकदार संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी मंगळवारी येथे दिली. ही रक्कम परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी आमच्याकडे अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पर्ल्स गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचे येथे आयोजन केले होते. या वेळी उटगी बोलत होते. या घोटाळय़ाची माहिती देताना उटगी म्हणाले, सेबीने १९९९ मध्ये एक विशेष कायदा केला. त्याआधारे पर्ल्सने गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करताना सेबीच्या कायद्याला धाब्यावर बसवून योजना नोंदणी न करता ५ कोटीहून अधिक गुंतवणूकदारांच्या ठेवी बेकायदेशीरपणे गोळा केल्या. योजनेनुसार ३ वर्षांत रक्कम दुप्पट करणे व जमीन विकत देणे यापकी काहीही केले नाही. त्यावर अनेक गुंतवणूकदारांनी या फसव्या योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. याच वेळी अखिल भारतीय पर्ल्स (पीएसीएल) गुंतवणूकदार संघटनेने या घोटाळय़ाविरुद्ध आंदोलन उभे केले. मुंबई तसेच नवी दिल्ली येथे उपोषण केले.

या लढय़ाची दखल घेत न्यायालयाने लोढा समितीची स्थापना केली. या कंपनीचा मालक निर्मलसिंग भांगूसह इतर चार संचालकांना सीबीआयने जानेवारीत अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे रखडलेले पसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘सेबी’ने पर्ल्सच्या दीड लाख कोटीच्या मालमत्ता जप्त केल्या असून, त्याची व्याप्ती ६ लाख कोटीपर्यंत जाण्याची शक्यता उटगी यांनी वर्तवली. या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून मिळणारी रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जाणार आहे. त्यासाठी सेबीने विहित नमुन्यातील अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. आम्ही संघटनेच्या वतीने अर्ज भरून घेत आहोत. त्याची एक प्रत गुंतवणूकदाराकडे, एक ‘सेबी’कडे, तर एक संघटनेकडे ठेवली जाणार असून, रक्कम बँक खात्यात जमा होईपर्यंत लढा सुरू ठेवला जाणार असल्याचे संघटनेचे राजन क्षीरसागर यांनी सांगितले. सेबीचे कार्यालय मुंबई, दिल्ली येथे असून गुंतवणूकदार मात्र देशभर असल्याने अर्ज भरून घेण्यासाठी सेबीने पासपोर्ट शिबिराप्रमाणे राज्यात जिल्हानिहाय तात्पुरते कार्यालय सुरू करण्याची मागणी उटगी यांनी आज गुंतवणूकदार मेळाव्यात केली . या वेळी शंकर पुजारी, अनिल चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले.

युवराज, हरभजनवर गुन्हा दाखल करा

पर्ल्स कंपनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन युवराज सिंग, हरभजन सिंग, ब्रेट ली या क्रिकेटपटूंनी कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून केले होते. त्यांच्या आवाहनाला भुलून लाखो गुंतवणूकदारांनी आपली पुंजी गुंतवली. आता ती बुडाली असल्याने या ‘सेलिब्रेटीं’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी उटगी यांनी केली.

राज्य शासनाने कारवाई करावी

ओडिशा शासनाने गुंतवणूकदारांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्या राज्यातील पर्ल्ससह अशा फसव्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या. राज्यातील भाजप-शिवसेना या सत्ताधाऱ्यांनी गुंतवणूकदाराचे संरक्षण करण्याची भाषा अनेकदा केली आहे. आता त्यांनी पर्ल्स, शारदा, मत्रेय आदी कंपन्यांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी उटगी यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pearls group asset sale to refund investors

ताज्या बातम्या