कोल्हापूर : समाज माध्यमाचा प्रभावी वापर करून भाजपकडून महाविकास आघाडीबाबत जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जयसिंगपूर येथे केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी यांचा कोल्हापूर जिल्हा परिसंवाद याञा दौरा आजपासून सुरू झाला. जयसिंगपूर येथील लोकनेते शामराव पाटील यड्रावकर नाटय़गृहात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पाटील यांनी काळाचे बदलता प्रवाह लक्षात घेऊन समाज माध्यमाचा खुबीने वापर करण्यास शिकले पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बूथ समितीच्या माध्यमातून जनतेत जाऊन जनसंवाद करीत उत्तर दिले पाहिजे. या वेळी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडे कर, विधानसभा अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली.

 ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी एकसंध भारत घडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करा. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचना दिल्या. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अनिल साळुंखे, दादेपाशा पटेल यांच्यासह कार्यकर्त उपस्थित होते.

शेट्टींनी आघाडी सोबत राहावे

राजू शेट्टी यांनी एखादे काम मला वा अन्य मंत्र्यांना सांगितल्यावर त्यास नकार दिला असल्याचे आठवत नाही. त्यामुळे त्यांनी महा विकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. देशात व राज्यात भाजप शेतकऱ्यांना चिरडत आहे. या विरोधात आघाडी लढा देत असून शेट्टी यांनी पुन्हा आघाडीसोबत राहावे, अशी साद जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात पत्रकारांशी बोलताना घातली.