सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी अखेर निलंबित केले आहे. डॉ. मदने यांच्या कारकिर्दीतील असंवेदनशील व्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली असून, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सोलापूर जिल्हा रुग्णालय निश्चित करण्यात आले आहे, असे या निलंबन आदेशात म्हटले आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून वरिष्ठांकडून होणारा त्रास व दबावामुळे व्यथित होऊन फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन येथे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या एका वर्षात तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह चार वर्ग-१ अधिकारी आणि इतर चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. स्वास्थ्य प्रमाणपत्रासाठी (फिटनेस सर्टिफिकेट) माजी आरोग्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने धमकावल्याचा व वरिष्ठांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येच्या पत्रामध्ये केला होता.

पोलिसांची निष्क्रियता आणि चौकशी समितीची अनास्था यांमुळे व्यथित होऊन त्यांनी २६ ऑगस्टला आत्महत्येचा इशारा देणारी चित्रफीत प्रसारित केली होती. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने २७ ऑगस्टला त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना ३१ रोजी सकाळी ११ वाजता त्यांची संघर्षयात्रा संपली. ९ महिन्यांत आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या डॉक्टरचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

डॉ. मदने यांच्या कारकिर्दीतील असंवेदनशील व्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी अखेर निलंबित केले आहे. फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या नातेवाईकांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फलटणमध्ये तणावाचे वातावरण आहे.