प्लॅस्टिक, खोबरेवाटी वापरास बंदी
दख्खनचा राजा श्री जोतिबाची चत्रयात्रा येत्या १० एप्रिलला वाडीरत्नागिरी येथे भरणार असून, त्याकरिता यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रा कालावधीत प्लॅस्टिक बंदी, खोबरेवाटी बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री जोतिबाच्या यात्रेसाठी येतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा चत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्वच यंत्रणांनी आपापली तयारी पूर्ण केली आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्याचा दावा गुरुवारी प्रशासनाने केला.
भाविकांना केंद्रिबदू मानून श्री जोतिबा चत्र पौर्णिमा यात्रेचे नियोजन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रांताधिकारी पातळीवर यापूर्वी ४ ते ५ बठका घेऊन आढावा घेण्यात आला आहे. अंतिम आढावा बठक नुकतीच जोतिबा डोंगर येथे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन यात्रा नियोजनावर अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. या बठकीत सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार यात्राकाळात काम करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत.
यात्राकाळात भाविकांची गरसोय आणि आरोग्याची हेळसांड होणार नाही, याबरोबरच त्यांना श्री जोतिबाचे तसेच पालखी आणि सासनकाठय़ांचे सुलभ दर्शन मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यात्रेच्या संपूर्ण तयारीमध्ये जिल्हय़ातील विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्था प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. ही सर्वार्थाने महत्त्वाची बाब मानावी लागेल.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने यंदाच्या श्री जोतिबा चत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त शास्त्रशुद्ध नियोजनाचा कृतिआराखडा तयार करण्यात आला न्या. कोचर आयोगाच्या शिफारशीनुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही गतिमान केली आहे. कृती आराखडय़ानुसार १०० तात्पुरती शौचालये, ३०० सुरक्षारक्षक, २५ वॉकीटॉकी, २० वाहनतळ, २० सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, ४५ हॅलोजन, अग्निशमन यंत्रणा सज्ज केल्या आहेत. जोतिबा मंदिराकडे १६ एचडी कॅमेरे तनात केले असून, त्याचे एक कनेक्शन आपत्कालीन नियंत्रण कक्षामध्ये देण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनाकरिता पश्चिम दरवाजातून प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांसाठी ४० केएमटी बसेसची तसेच एसटी महामंडळाच्या वतीने सुमारे ३०० एसटी बसची व्यवस्था केली आहे. यात्राकाळात भाविकांची सुरक्षा सर्वार्थाने महत्त्वाची असून, यात्राकाळात पुरेसा पोलीस बंदोबस्त तनात केला आहे.
