चलनातील वीस, शंभर, दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या खपवणाऱ्या डॉक्टरला एक हातगाडी विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. सुधीर रावसाहेब कुंबळे (वय ३३, रा. नागाळा पार्क, मूळ रा. धालवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी कुंबळेच्या दवाखान्यावर छापा टाकून २ हजारच्या ८, १००च्या १०, तर २०च्या ६ बनावट नोटांसह िपट्रर, स्कॅनर, कटर व एक्सेल बाँड पेपर जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, कागदपत्रांची पूर्तता न करता ७ लाखांच्या नोटा बदलून दिल्याचा प्रकार ताजा असतानाच बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की गुरुवारी दुपारी सुधीर कुंबळे हा भाऊसिंगजी रोडवरील चप्पल विक्रेते औरंगजेब मुबारक नदाफ यांच्या दुकानात बूट घेण्यासाठी गेला होता. २५० रुपयांचा बूट सुधीरने घेतला व २ हजारांची नवीन नोट दिली. यानंतर कुंबळे सुट्टय़ा पशासाठी गडबड करू लागला. मात्र एवढे सुट्टे पसे नसल्याने नदाफ यांनी कुंबळेस काही वेळ थांबण्यास सांगितले. मात्र काही वेळाने पुन्हा सुधीर सुट्टय़ा पशासाठी गडबड करू लागला. यामुळे नदाफ यांना सुधीरची शंका आली. त्यांनी २ हजारच्या नोटेची पाहणी केली असता त्यावरील पांढऱ्या गोलात महात्मा गांधीजींची प्रतिमा दिसली नाही. नदाफ यांनी सुधीरला बोलण्यात गुंतवून लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती कळवली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुधीर कुंबळेस ताब्यात घेतले. त्याच्याकडील नोटेची तपासणी केली असता, नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो पोलिसांच्या जाळय़ात सापडला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बनावट नोटा छापल्याची कबुली दिली.

पोलिसांनी खानविलकर पेट्रोल पंपासमोरील डॉ. कुंबळे याच्या मांगल्य क्लिनिकची झडती घेतली असता िपट्रर, कटर आणि १७ हजार १२० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या. यात २ हजार रुपयांच्या ८ नोटा, १०० रुपयांच्या १० नोटा, तर २० रुपयांच्या ६ नोटा आहेत. काही नोटा अर्धवट छापल्या आहेत. कुंबळे याने नुकतेच भाडय़ाच्या जागेत क्लिनिक सुरू केले होते.

नागाळा पार्क येथे त्याच्या मालकीचे घर असून, या ठिकाणी त्याची आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुली राहतात. सुधीरचे वडील डॉक्टर आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर गायकवाड, भारत कांबळे, अजिज शेख, सागर कोळी, नामदेव पाटील, विजय देसाई, विनायक फराकटे, राहुल देसाई यांनी ही कारवाई केली.