खबरदारीचा उपाय म्हणून संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही खासदारांच्या निवासस्थानासमोर मंगळवारी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तर यावरून शिवसेनेने वचपा काढला जाईल, असा इशारा दिला आहे.

दोन्ही खासदार रुईकर कॉलनी भागात राहतात. सध्या मंडलिक यांच्या निवासस्थानाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यांनी आपला मुक्काम भूविकास बँके जवळील दीप्ती अपार्टमेंट येथे हलवला आहे. त्यांच्या निवासस्थानी बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच खासदार माने यांच्याही रुईकर कॉलनी भागातील निवासस्थानासमोर पाच बंदूकधारी पोलीस तैनात केले होते. या दोन्ही खासदारांनी शिंदे घटक जाण्याची भूमिका घेतली असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेने या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.

शिवसेनेची टीका

खासदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असला तरी या खासदारांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. पत्रकारांशी बोलताना शहर समन्वयक हर्षल सुर्वे म्हणाले, खासदारांना इतक्या पोलिस संरक्षणाची गरज का बसावी हा प्रश्न पडला आहे. तुम्ही चांगले काम केले असते तर संरक्षणाची गरज भासली नसती. आता तुमची नीतिमत्ता ढासळली आहे. बंडखोरी करणे हे चांगलेनसल्याची भीती खासदारांना सतावत आहे. यामुळेच त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तथापि शिवसैनिक दगडफेक करून नव्हे तर निवडणुकीत पराभूत करून वचपा काढतील.