दयानंद लिपारे

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षांचा अवधी असतानाही कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखला जाणाऱ्या कागल मतदारसंघातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. माजी ग्रामविकासमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रतिस्पर्ध्याना आव्हान – प्रतिआव्हान द्यायला सुरुवात केल्याने वातावरण तापले आहे. शिवराळ भाषेत टीकाटिप्पणी होत आहे.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
Election in Akola Lok Sabha Constituency between BJP Vanchit and Congress
अकोल्यात चुरशीची तिरंगी लढत
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी
sanjay mandlik
बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळाले आहे. येथील संघर्ष हा जिल्ह्याच्याच नव्हे राज्याच्या पातळीवर लक्षवेधी ठरला होता.दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांच्यातील वाद जवळपास दोन दशके गाजला होता. पुढे मंडलिक यांचे पुत्र खासदार संजय मंडलिक व मुश्रीफ यांच्यात समझोत्याचे राजकारण सुरू झाले. तर मुश्रीफ यांच्या गोटातून बाहेर पडल्यानंतर समरजित घाटगे यांनी दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे गटाची स्वतंत्र बांधणी सुरू केली. राजर्षी शाहू महाराज यांचे जनक घराणे हे घाटगे कुटुंबातील. त्यामुळे कागलच्या राजकारणात घाटगे गट हा राजे गट म्हणूनही ओळखला जातो. घाटगे यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न बाळगले आहे. गेल्या वेळी त्यांनी मुश्रीफ यांना आव्हान दिले; पण या निवडणुकीत विजय मिळवत ते पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले. पुढील विधानसभा निवडणूक होण्यासाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंतच कागलच्या राजकीय कुरुक्षेत्राचे समर तापू लागले आहे.

रामनवमीवरून महाभारत

एप्रिल महिन्यात रामनवमीवरून मुश्रीफ- घाटगे यांच्यातील वादाचे महाभारत रंगायला सुरुवात झाली. रामनवमी दिवशी मुश्रीफ यांचा वाढदिवस असतो. या दिवशी त्यांचा जन्म झालेला नाही, असा आक्षेप घाटगे यांनी कागदपत्रे दाखवत घेतला. घाटगे खोटे बोलत असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी पुरावे सादर केले. या मुद्दय़ावरून दोन्ही गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पोलीस ठाण्यावर मोर्चे काढले. यातून कागलचे राजकारण धगधगत राहिले. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याची ती नांदी ठरली.

वाढती रंगत राज्यात महाविकास

आघाडीचे सरकार असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत यावरून घाटगे हे सातत्याने मुश्रीफ यांच्यावर आरोप करीत राहिले. त्याचे खंडन मुश्रीफ करीत होते. राज्यात सत्ता बदल झाल्यावर वादाचा कल बदलला. नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत नव्या सरकारने उणिवा दूर कराव्यात, असा ठराव मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी केला. त्यावर घाटगे यांनी आघाडीचे सरकार असताना उचित कार्यवाही करण्याबाबत तुम्ही झोपला होतात का, अशी टीका मुश्रीफ यांच्यावर केली. यातून कलगीतुरा रंगतच चालला आहे.

वादाची घसरती पातळी

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कागल मतदारसंघासाठी आलेला निधी घाटगे यांच्यामुळे राज्य शासनाकडे परत गेला असल्याचा आरोप मुश्रीफ समर्थक करीत आहेत. हा मुद्दा जाहीरपणे मांडताना मुश्रीफ यांनी तुमच्यात मर्दुमकी असेल तर निधी आणावा. त्यासाठी पुरुषार्थ असावा लागतो, अशी बोचरी टीका केली. त्यातील पुरुषार्थ शब्दाला घाटगे यांनी आक्षेप घेत पातळी घसरत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर मुश्रीफ यांना पाडून विधानसभेत जाणार, अशी घोषणा घाटगे यांनी केली. त्यावर मला पाडणारा जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी दिले. या वादात नवोदिता घाटगे या उतरल्या. त्यांनी विजयी होणार असा अहंकार नको, तो रावणालाही होता; असे म्हणत पुन्हा मुश्रीफ यांना डिवचले आहे. नवोदिता घाटगे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कागलच्या माजी नगराध्यक्षांसह मुश्रीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले गेले. याला प्रतिउत्तर देत मुश्रीफ समर्थकांनी मोर्चा काढून समरजित घाटगे यांच्या विरोधी घोषणा देत निषेध नोंदवला. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्ते फोडण्याला उत्तेजन दिले जात आहे. दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तरी प्रतिस्पर्धी गटाला खिंडार पडले अशी जाहिरातबाजी केली जाते. या सर्व प्रकारांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची किनार असली तरी त्याचा दर्जा घसरत असल्याने कागलकरांसमोर चिंता आहे.