scorecardresearch

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास आघाडीच्या दिशेने?

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास महाविकास आघाडीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

दयानंद लिपारे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास महाविकास आघाडीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. श्रीमंत शाहू महाराज यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली आहे. तर युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या आठवडय़ात ‘वेगळी’ राजकीय दिशा स्पष्ट करणार असे विधान केले आहे. युवराज माजी आमदार संभाजी राजे छत्रपती काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत. सातारचे दोन्ही छत्रपती भाजपमध्ये सक्रिय असताना करवीरचे छत्रपती घराणे ‘मविआ’च्या संपर्कात राहणे ही राज्याच्या राजकारणाच्या दृष्टी उल्लेखनीय घटना मानली जात आहे.

सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गादीचे वारसदार राजकारणात सक्रिय असल्याचा इतिहासही आहे. साताऱ्याचे अभयसिंहराजे भोसले यांनी सहकार खाते भूषवले होते. त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले हे सुरुवातीला राष्ट्रवादीकडून आणि आता भाजपचे आमदार बनले आहेत. तर अपक्ष, राष्ट्रवादी असा प्रवास करीत उदयनराजे भोसले हे भाजपकडून राज्यसभेचे सदस्य बनले आहेत.

 कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज थेट राजकारणात नसले तरी त्यांनी पुरोगामी पक्षांना बळ दिले. संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढताना पराभव पत्करावा लागला होता. सहा वर्षांपूर्वी त्यांना राष्ट्रपती कोटय़ातून राज्यसभा सदस्यत्व देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग महत्त्वाचा होता. भाजपचे मराठा संघटन भक्कम करता येईल असा यामागे उद्देश होता. तथापि संभाजीराजे यांनी निवड झाल्यानंतर थेट भाजपची प्रचारकाची उघड भूमिका घेतली नाही. आता दोघांतील नाते ताणले गेले आहे. अशातच त्यांनी ‘माझा ३ मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यावर ‘वेगळी राजकीय दिशा’ स्पष्ट करेन,’ असे विधान केले आहे. त्यांच्या नव्या राजकीय भुमिकेविषयी उत्सुकता आहे. अलीकडे त्यांचा संपर्क राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी वाढला आहे. याच वेळी ते वेगळा पक्ष काढणार का, अशीही चर्चा आहे.

मालोजीराजे काँग्रेसमध्ये सक्रिय

 कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सलग तीन निवडणुकीतील विजयाने दाखवून दिले असताना मालोजीराजे छत्रपती यांनी ही परंपरा खंडित करून काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. पुढच्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ते राजकीय वर्तुळापासून दूर राहिले. तथापि त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सतत होत राहिली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मालोजीराजे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. आगामी निवडणुकीसाठी मालोजीराजे हे उमेदवार असले पाहिजेत, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात श्रीमंत शाहू महाराज यांनी ‘देशाच्या राजकारणात पुढील शंभर वर्षे आपल्याशिवाय कोणी नाही असे काहींना वाटते. तुम्ही काही काळ लोकांना फसवू शकता; सदासर्वकाळ नाही,’ अशी टीका पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली होती. ‘कोल्हापूरमध्ये प्रतिगामी शक्ती प्रस्थापित होणे कठीण आहे; हेच सतेज पाटील, मालोजीराजे यांच्या प्रयत्नामुळे पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे,’ हे त्यांचे विधान राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

काँग्रेसमध्ये मी सक्रिय झालो ही गोष्ट खरी असली तरी यापूर्वी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मी – मधुरिमाराजे लोकांमध्ये मिसळत होतो. विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. राजकीय निर्णय घेण्यास संभाजीराजे छत्रपती स्वत: सक्षम आहेत. संभाजीराजे यांना भाजपकडून खासदारकी मिळाली तरी ते काही प्रमाणात परिवारात मान्य नव्हते. एक मात्र खरे की, श्रीमंत शाहू महाराज यांनी थेट राजकीय भूमिका कधी घेतली नाही. देशात जे चालू आहे त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. कोल्हापूरचे छत्रपती घराणे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणारे असल्याने राजकीय प्रवास त्यापासून विभक्त होणार नाही.

– मालोजीराजे छत्रपती

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political journey chhatrapati kolhapur front political chhatrapati dynasty political ysh