|| दयानंद लिपारे

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेचे त्रांगडे झाले असताना, आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, असे नवे समीकरण आकाराला येत आहे. भाजपच्या विरोधात  हे समीकरण यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्य़ात जुळले आहे. कोल्हापूर महापालिकेत अशी आघाडी सत्तेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील राजकीय डावपेचात याच तिघांनी परस्परांना मदत केली.  हेच सूत्र राज्यभर राबविले जाणार आहे.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र लढून सत्ता स्थापन केली. त्यांचे संख्याबळ ४४ आहे, तर विरोधी भाजप- ताराराणी आघाडीकडे ३३ संख्याबळ आहे. शिवसेनेकडे चार नगरसेवक आहेत. काठावरचे बहुमत असल्याने प्रत्येक महापौर निवडीवेळी सत्ता मिळवण्याचे विधान चंद्रकांतदादा पाटील हे करीत असत. मात्र त्याला मातोश्रीवरून कधीच पाठबळ मिळाले नाही. शिवसेनेने महापालिकेच्या राजकारणात भाजपपेक्षा सत्तारूढ उभय काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापतीपद देऊन सत्तेचा काही प्रमाणात वाटा शिवसेनेच्या पदरात पडला आहे. कोल्हापूर महापालिकेत या आघाडीचा कारभार सुखेनैवपणे सुरू आहे.

कोल्हापूर महापालिकेत जमलेले मित्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतही दिसून आले. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विरोध म्हणून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेत असणारे संजय मंडलिक यांना खासदार करण्याची भूमिका लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वर्षे आधी घेतली होती.

मंडलिक यांना आघाडीत आणून महाडिक यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला यश आले नाही. लोकसभेचा आखाडा तापल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ असे घोषवाक्य बनवून उघडपणे मंडलिक यांची बाजू घेतली.

मुश्रीफ प्रचारात असले तरी आतून मंडलिक यांना मदत केली. मंडलिक यांचा विजय हा ‘महाआघाडी’चा विजय ठरला. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत झाली. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना खासदार मंडलिक यांनी मदत केल्याने भाजपचे अमल महाडिक पराभूत झाले.

कागल विधानसभा मतदारसंघातही मुश्रीफ यांना मिळालेले मताधिक्य पाहता मंडलिक यांनी कोणाला मदत केली हे दिसून येते. विधानसभा निवडणूक प्रचारकाळात भाजप-शिवसेनेमध्ये सुप्त तणाव वाढीस लागला होता. जनसुराज्यशक्ती पक्षाच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेच्या तीन आमदारांसह चार उमेदवारांना अडचणीत आणल्याने शिवसेनेत नाराजी होती. त्याचे उट्टे काढण्यासाठी भाजपचे दोन्ही उमेदवार असलेल्या मतदारसंघांत शिवसेनेने भाजपच्या विरोधात मोहीम उघडून त्यांच्या दोन्ही आमदारांना पराभूत केले. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्य़ातही विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे राजकारण भरात आले होते. त्यात शिवसेनेचे आणि भाजपचे दोघाचे नुकसान होऊन उभय काँग्रेसचे फावले.