scorecardresearch

पुरेशा संख्याबळाशिवाय राज्यात सत्ताबदलाची शक्यता नाही -मुश्रीफ

पाच राज्यांतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा आहे.

कोल्हापूर : पाच राज्यांतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा आहे. तथापि भाजपकडे १४५ आमदारांचे संख्याबळ होत नाही तोपर्यंत सत्ताबदलाची शक्यता नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे सत्तेवर राहील,असे प्रत्युत्तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना सोमवारी येथे दिले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले,की संभाजीराजे यांच्या मागण्यांबाबत राज्याचे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करता येईल. मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मकच राहिली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आघाडी सरकारवर ताशेरे ओढणारे खरमरीत पत्र लिहिले आहे.

याविषयी मुश्रीफ म्हणाले,की शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न मांडले आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाचा मुद्दा आहे. महावितरणवर ६० हजार कोटी रुपये कर्जाचा बोजा आहे. त्यांना कर्ज घेण्यास मर्यादा आल्या आहेत. कोळसा खरेदीसाठीही पैसा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक योजना आणली होती. त्यादृष्टीने शेतकरी व शासन यांनी काही भाग मिळून हा प्रश्न सोडवणे शक्य आहे. याबाबत त्यांची ऊर्जा मंत्र्यांची बैठक घडवून आणली जाईल. राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी योजना राबवून २० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तेव्हा शेट्टी यांनी मागण्यांचा पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा मंत्र्यांनी शेट्टी यांच्या मोर्चाच्या पूर्वसंध्येला केली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Possibility change of power sufficient numbers ysh

ताज्या बातम्या