सोलापूर: प्रसिद्ध सरकारी वकील आणि भाजपचे राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा हिंदी चित्रपट ऑगस्ट महिन्यात (७ ते ९ ऑगस्टदरम्यान) देशभरात प्रदर्शित होणार आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना ॲड. निकम यांनी स्वतः या आगामी चित्रपटाविषयीची अधिकृत माहिती दिली.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फासावर लटकावण्यात कायदेशीर पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ॲड. उज्ज्वल निकम सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीसाठी आले होते. या दौऱ्यादरम्यान संध्याकाळी त्यांनी अक्कलकोट रोडवरील ‘हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी’चे सदस्य आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधताना त्यांनी ‘प्रहार’ चित्रपटाचा ट्रेलर दाखवला आणि त्यामागची पार्श्वभूमी विशद केली.
चित्रपटात कसाब खटल्याचे हुबेहूब चित्रण व तगडी स्टारकास्ट…
माध्यमांशी आणि उपस्थितांशी बोलताना खासदार ॲड. निकम म्हणाले की, “माझ्या जीवनावरील या चित्रपटात माझी भूमिका प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याने साकारली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात मुंबईतील २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला, त्या संदर्भातील संवेदनशील प्रसंग, अत्यंत गुंतागुंतीची न्यायालयीन कारवाई आणि मुख्य आरोपी कसाबला कायदेशीर रीतीने झालेली फाशी, या सर्व थरारक घडामोडींचे हुबेहूब चित्रण व कायदेशीर पैलू मांडण्यात आले आहेत.”
हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून एक ऐतिहासिक माहितीपटही ठरेल, त्यामुळे तो सर्वांनी नक्की पहावा, असे आवाहनही त्यांनी केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक अविनाश अरुण करत असून, चित्रपटात राजकुमार राव यांच्यासोबत वामिका गब्बी, सिकंदर खेर आणि जयदीप अहलावत या कसलेल्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
तत्पूर्वी, चौगुले यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर वर्षा चौगुले आणि सोसायटीच्या चेअरमन अंजली माशाळकर यांनी खा. निकम यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. या सदिच्छा भेटीदरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूर्यप्रकाश कोठे, सोसायटीचे सचिव सिद्धेश्वर श्रीगादी, कोषाध्यक्ष काशिनाथ बिराजदार, तसेच सुरेश येळमेळी, शंकर गाडी, गुरुशांत ढंगे, शिव कोरे, शिवया मसुती, डॉ. खानापुरे, चन्नप्पा बिराजदार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
