कोल्हापूर : आपले आरोग्य बिघडल्यावर सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो. तद्वत, शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण जरूर करून घ्यावे. याची सवय, शिस्त लावून घ्यावी. याद्वारे शेतमालाचे उत्पादनात वाढ होण्यास निश्चितपणे मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी येथे केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना’अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘हेक्टरी १२५ टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ’ अभियानातील हा एक महत्त्वाचा घटक आहे.
जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ या अभियानाला भुदरगड तालुक्यातील पळशिवणे या गावातून शुक्रवारी सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, ‘गोपाल रत्न’ पुरस्कार विजेते अरविंद पाटील, कृषी विज्ञान केंद्र कनेरी येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र वावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काही शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे वितरणही करण्यात आले.
अभियानाबाबत बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रमाणपत्र केवळ वितरित करून चालणार नाही, तर त्यांना त्या अहवालातील मुद्दे पटवून दिले पाहिजेत. त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे. शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा पोत आणि कस माहिती व्हावा, तसेच उत्पन्न वाढीसाठी नेमक्या पद्धतीने काय करावे लागेल, हे माती परीक्षण अहवालात नमूद असते. ते त्यांना समजावून सांगावे लागेल. शेतकरी आपल्या शेतात असतो, त्याप्रमाणेच कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन करावे. उत्पन्न वाढीसाठी माती परीक्षण आवश्यकच असून, कृषी विभागाच्या मार्गदर्शनातूनच उत्पन्न वाढ साधता येईल.
जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माती परीक्षण माहिती पत्रिके’चे अनावरण करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांनी ‘डिजिटल मदतनीस – महाविस्तार मोबाईल ॲप’ या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित माध्यमाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग – महाराष्ट्र शासन आणि तालुका कृषी अधिकारी, भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
पळशिवणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात यावेळी माती परीक्षणासाठी आवश्यक नमुने घेण्याची शास्त्रोक्त पद्धत तज्ज्ञांमार्फत शेतकरी व उपस्थितांना समजावून सांगण्यात आली.
