​सातारा : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान आणि गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर आज शुक्रवारी (दि. १६) रात्री एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले प्रतापगडावरील श्री भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३६७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रतापगडावर भव्य ‘मशाल महोत्सव’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, संपूर्ण दुर्ग परिसर भगव्या व तेजोमय प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले प्रतापगडावर जमा होऊ लागले आहेत.

​खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. यंदा या महोत्सवाचे सोळावे वर्ष असून, चंद्रकांत उतेकर व ग्रामस्थांच्या वतीने याचे नेटके आयोजन केले गेले आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी सायंकाळी भवानी मातेची विधिवत पूजा व पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर ‘स्वराज्य ढोल पथका’चे संचलन व प्रेरणादायी वादन होणार असून, रात्री आठ वाजता गडाच्या ऐतिहासिक तटबंदीवर ३६७ मशाली एकाच वेळी पेटवल्या जातील.

​मशाली तयार करण्याची अनोखी परंपरा

​या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाची तयारी तब्बल १५ ते २० दिवस आधी सुरू होते. उत्सव समितीने ३६७ स्टेनलेस स्टीलच्या विशेष मशाली तयार करून घेतल्या आहेत. प्रत्येक मशाल प्रज्वलित करण्यासाठी सुमारे २५० सुती साड्यांचा वापर करण्यात येतो. या सर्व साड्या १५ दिवस आधी सुमारे १५० किलो तेलामध्ये भिजवून मुरु दिल्या जातात, जेणेकरून मशाली सहज पेट घेतील आणि अखंडित तेवत राहतील.

भाविकांसाठी विशेष सुविधा

​महोत्सवादरम्यान होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रतापगडापासून चार किलोमीटर अंतरावरील वाडा कुंभरोशी येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून भाविकांना गडाच्या पायथ्यापर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने चार विशेष बसेसची मोफत सोय करण्यात आली आहे. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.