कराड : विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष स्वतःचे संपुष्टात येत असलेले राजकीय अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून, भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जनता ओळखते, असा निशाणा भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे बंधूंवर साधला.

दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बेलदरे, (ता. कराड) येथे आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ तसेच ‘हरित महाराष्ट्र- समृद्ध महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत देशी गोसंवर्धन व वृक्षारोपण अभियानाच्या कार्यक्रमानंतर आमदार दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पेपरफुटी प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आंदोलनात आगीत तेल ओतत आहे आणि कोण खतपाणी घालत आहे, हे जनतेला स्पष्टपणे दिसत आहे. जनता सुज्ञ असून, ती योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असे दरेकर यांनी नमूद केले.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे या बंधूंना लक्ष्य करताना, दरेकर म्हणाले, बैल गेला अन् झोपा केला, या म्हणीप्रमाणे ठाकरे बंधू सगळे झाल्यानंतर जागे होतात. त्यांच्या भूमिकांमुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार अशी टिपण्णी त्यांनी केली.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांना उत्तम दीर्घायुष्य लाभावे, पुढील १०- १५ वर्षे महाराष्ट्राला त्यांचे नेतृत्व लाभावे, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.