कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यांनी देवीला कुंकुमार्चन, अभिषेक करून विधिवत पूजा केली. एकारती, पंचारती व कर्पुरआरती केली. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने आदी यावेळी उपस्थित होते.

देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती मुर्मू व राज्यपाल राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडून या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली. मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. कोल्हापूरच्या मंदिरात दर्शन घेणाऱ्या मुर्मू या पहिल्याच राष्ट्रपती आहेत.

हेही वाचा >>>कारण राजकारण: ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वच पक्ष चेहऱ्याच्या शोधात

राष्ट्रपती आज मुंबईत

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त मंगळवारी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहातील सदस्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारही मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.

वारणा समूहामुळे सहकाराला आधुनिकतेची दिशा’

आधुनिक काळात सहकार तत्व वाढीस लागले आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीतही सहकार तत्त्वाची मूल्ये आढळून येतात. वारणा सहकार समूहाने याच मूल्यांमधून सहकार क्षेत्राला आधुनिकतेची दिशा दिली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणा विद्यापीठ उद्घाटन समारंभ सोमवारी वारणा नगर येथे राष्ट्रपतींच्या उपस्थित पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.