महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहम याचे फोनवरून बोलण्याचा आरोप हा प्रकार गंभीर आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी निगडित हा मुद्दा असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड संपादित करण्याची खडसे यांची कृती बेकायदशीर आहे. या जमिनीची मालकी एमआयडीसीची असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांनी मंत्रिपदाच्या अधिकाराचा गरवापर करून जागा बळकावली आहे.
दरम्यान डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाचा कट रचल्याच्या संशयाची सुई सनातन संस्थेवर आहे. मी मुख्यमंत्री असताना या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. याबाबतचे पुरावे दिले असतानाही केंद्र शासन सनातन संस्थेबाबत मवाळ दिसत आहे. या संस्थेवर बंदी घातली नाही, तर आणखी किती खून होतील असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी केंद्र शासनाच्या अखत्यारीत सनातनवरील बंदीचा विषय असल्याने त्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली.