कोल्हापूर : सुजाण नेतृत्वाला समाजशास्त्राची जाण आणि भान असणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यापीठे केवळ पदवीदानाची केंद्रे न राहता ज्ञाननिर्मितीची सक्रिय केंद्रे बनली पाहिजेत.
समाजात परिवर्तन घडविण्यासाठी समाजशास्त्राचे अध्ययन आणि इतिहासाचे सकारात्मक संशोधन या दोन बाबींच्या महत्त्वाची जाणीव असणारे नेतृत्व विकसित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद आणि कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणात समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधावर भाष्य केले. ते म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास संशोधन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र संशोधन निधी निर्माण करणे आवश्यक आहेच, पण उद्योजकांनीही संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. मराठा इतिहास व्यापक समाजासमोर प्रभावीपणे मांडायचा असेल, तर मोडी कागदपत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अपरिहार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात निवृत्त प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, इतिहासकार विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. इतिहासलेखनात वस्तुनिष्ठता, चिकित्सक दृष्टी आणि निर्भीडपणाही आवश्यक असून इतिहास लेखन हे भावनांपेक्षा पुराव्यांवर आधारित असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अवनीश पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, अॅड. रविंद्र पवार, डॉ. संदीप महाजन, डॉ. सुनील जाधव, डॉ. सुरेखा पाटील, डॉ. अजित पवार, इतिहासाचे शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अभयकुमार पाटील यांनी आभार मानले.
इतिहास परिषदेची वाटचाल
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेला २८ वर्ष पूर्ण झालेले आहेत. या २८ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एकूण २४ अधिवेशने विविध महाविद्यालयात पार पडली. परिषदेचे २५ वे रौप्य महोत्सवी अधिवेशन शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिभागामध्ये संपन्न झाले. परिषदेचे आज एकूण जवळ जवळ ४०० सभासद आहेत.
परिषदेच्या कामकाजाकरिता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इतिहास प्राध्यापकांमध्ये ऐक्य, स्नेहभाव आणि इतिहास ज्ञानाची देवाण-घेवाण वाढवून शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांना प्रवृत्त करणे, वार्षिक चर्चासत्र आयोजित करून सभासदांना संशोधनपर शोध निबंध सादर करण्यास प्रोत्साहन देणे, चर्चासत्रांत वाचलेल्या निवडक शोधनिबंधांचे संशोधन पत्रिके मार्फत संपादन आणि प्रकाशन करणे, वेळोवेळी परिसंवाद, प्रशिक्षण वर्ग, उद्बोधन अभ्यासक्रम इत्यादी उपक्रम घेणे. सभासद प्राध्यापकांच्या सततच्या अध्ययन प्रवृत्तीस प्रोत्साहन देणे.विषयांतील नवीन संशोधन कार्याची ओळख करून देणे आधी या परिषदेचे उद्दिष्टे आहेत.
