खासगी दूरचित्रवाणीवर दाखविण्यात येणाऱ्या ‘चेहरा ओळखा’ स्पर्धेत त्याने भाग घेतला. पुढे त्याला जिंकल्याचे सांगत फसवणुकीचे चक्र सुरू झाले. तब्बल १३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर पैसे देणाऱ्यांनी तगादा लावला. घर-दार विकले गेले. या साऱ्या नराश्येतून शेवटी त्याने आत्महत्या केली. कागल तालुक्यातील महेश रामचंद्र सूर्यवंशी (वय ४३) यांची ही दुर्दैवी कथा.
सूर्यवंशी हे पत्नी, दोन मुलांसह िपपळगाव खुर्द (ता. कागल) येथे राहात होते. ते खासगी कंपनीत कामावर होते, तर पत्नी गावात पिग्मी एजंटचे काम करते. एका खासगी वाहिनीवर ‘चेहरा ओळखा’ स्पध्रेत त्यांनी जून २०१५ मध्ये सहभाग घेतला. यानंतर दोन दिवसात त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि ‘तुम्ही ही स्पर्धा जिंकली असून, कोटय़वधी रुपयांचे बक्षीस लागले आहे. मात्र, त्यासाठी कंपनीच्या बँक खात्यावर एक हजार रुपये भरून खाते उघडा’, असा निरोप दिला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून ऑक्टोबर २०१५ पर्यंत संबंधित व्यक्तीने टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत तब्बल १३ लाख ४० हजार रुपये उकळले. सूर्यवंशी  यांनी हे पैसे देण्यासाठी अन्य लोकांकडून उसने पैसे घेतले. दरम्यान कोटय़वधीचे बक्षीस तर दूर राहात पैशांची मागणी सुरूच राहिल्याने सूर्यसंशी यांना शंका आली. यावरून त्यांनी संबंधित वाहिनीचे कार्यलय गाठले. पण संबंधित कंपनीने दिलेला पत्ताच बोगस निघाला. त्यांनी दिलेले संपर्क क्रमांकही बंद असल्याचे लक्षात आले.
दरम्यान त्यांना उसने पैसे दिलेल्यांनी पैशासाठी तगादा लावला. यासाठी अलीकडे त्यांनी राहते घर विक्रीसाठी काढले. पैसे गेले, घर घेले, समाजात फिरणे अवघड झाल्याने हे सर्व कुटुंबच गेले काही दिवस तणावाखाली होते. यातूनच काल त्यांनी आत्महत्या केली. महेश यांचा मुलगा सहावीला, तर मुलगी आठवीला आहे. आपल्याला न्याय मिळावा म्हणून महेश यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे अर्ज केले होते. त्यात आपल्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, असेही सूचित केले होते.  मात्र पोलिसांनी हे म्हणणे खोडून काढत, अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी हा उल्लेख केला आहे.