वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सभेत केला. उत्तर कोल्हापुर विधानसभा पोटनिवडणुकीत आज भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या समर्थनात प्रचारसभा झाली. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले , भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपनेते उपस्थित होते.उपस्थितांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यापूर्वी आधी कोल्हापुरात यायचो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेले फोटो दिसायचा. आता त्यांच्या फोटोसोबत सोनिया गांधींचा फोटोचे बॅनर दिसतात. हे उत्तर कोल्हापूर भगव्याचं आहे, ते भाजपाकडे आले पाहिजे. आता चुकलो तर पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही, अस इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्याबद्दल ते म्हणाले की, आमची लढाई माऊलींशी नाही तर तिच्या मागे असणाऱ्या पालकमंत्र्याशी आहे. 2024 साली हाच पालकमंत्री उत्तरेतून काँग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणार आहे. राज्यात सध्या दहशतीचे वातावरण आहे, ते जनता रस्त्यावर उतरल्यावर चालू देणार नाही. वेश्यांना मदत करतो असे राज्य सरकारने केंद्राला सांगितले आणि ते पैसे नांदेडच्या एका संस्थेला दिले. ते पैसे वेश्यांना नाही तर दुसऱ्यांनाच गेले असा आरोप फडणवीस यांनी केला. वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल त्यांनी केला.