कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उद्या, मंगळवारी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन विविध संघटना, सर्वसामान्य जनता यांना सोबत घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार येथे इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
कृषी दिनाचे औचित्य साधत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी बारा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हातही पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीची येथे बैठक झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार अध्यक्षस्थानी होते. ठाकरेसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाकपच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कांबळे यांनी आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने उतरतील अशी ग्वाही दिली.
पोलिसांनी दडपशाही करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.