कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवीत कृषिदिनी मंगळवारी येथील पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देत सुमारे दोन तासाहून अधिक काळ हजारो शेतकरी आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.
नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. तर दुसरीकडे महामार्ग जाणाऱ्या जिल्ह्यातून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या बारा जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
येथील पंचगंगा नदी पुलावर आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गरज नसलेला महामार्ग कायमस्वरूपी रद्द करा, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या अशा घोषणा देण्यात येत होत्या. आंदोलनामुळे दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक शाखेने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती.
इंडिया आघाडीचे नेतृत्व
आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलकांना नोटीस
शक्तिपीठ विरोधातील आंदोलन करण्यात येऊ नये अशा आशयाच्या नोटिसा काल रात्री उशिरापासून शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी बजावल्या होत्या. राजू शेट्टी यांनाही पोलीस बंदोबस्तात नोटीस दिली होती. त्यास प्रतिसाद न देता सर्व नेते आजच्या आंदोलनात सहभागी झाले.
जलसमाधीचा प्रयत्न
आंदोलन सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते पंचगंगा नदी पुलावर पोहोचले. ते नदीमध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यातून पोलीस व कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.