कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्या कारभाराविरोधात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन करत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अन्यायकारक, मनमानी व दिशाभूल करणाऱ्या खुलाशाच्या पत्रकाची होळी करण्यात आली. डॉ. साळी यांनी प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सुटाने बेमुदत उपोषण व पुढील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले आहे.

सुटाने सहसंचालक डॉ. साळी यांच्याबरोबर चर्चा करण्याबरोबरच आंदोलनाचे दोन टप्पे पूर्ण केले. पण, त्यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. प्रश्नांची निर्गत करण्यासंबंधी कोणतीही ठोस पावले त्यांनी उचलली नाहीत. उलट सुटाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती लपवून समाजाची दिशाभूल करणारा खुलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

त्यांचा कारभार बेकायदेशीर, मनमानी असल्याचा ठपका ठेवत  त्याविरुद्ध ‘सुटा’ने  बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला. शिवाय टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवण्याचा इशारा दिला होता. ‘सुटा’ने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दुपारी  शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सहसंचालकांच्या खुलाशाच्या पत्रकाची होळी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनात सुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील, उपाध्यक्ष आर. डी. ढमकले, एस. एम. पवार, यू. एम. वाघमारे, प्रकाश कुंभार, बी. बी. जाधव, आर. जी. कोरबू आदी सहभागी झाले होते.

सर्व प्राध्यापकांना ऑनलाईन वेतन मिळावे, शारीरिक शिक्षण संचालक, नेट / सेटमुक्त प्राध्यापकांची स्थाननिश्चिती विनाविलंब करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी या मागण्यांचे  निवेदन दिले. यावर डॉ. साळी यांनी आपल्या कार्यालयाच्या अखत्यारीतील मुद्दय़ांची पूर्तता ३१ ऑगस्टपूर्वी तसेच शासनपातळीवरील मुद्दय़ांची पूर्तता एक महिन्यात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. तसेच उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यावर सुटाने उपोषण व पुढील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले आहे.