कोल्हापूर : पुणे विमानतळावर प्रवाशांवर दररोज १२ ते १५ लाख रूपयाचा दरोडा कसा टाकला जातो याचा अनुभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. देश विदेशातून पुणे विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना टॅक्सी शोधताना येणाऱ्या अडचणी आणि टॅक्सीतून प्रवास केल्यानंतर खिसा कसा कापला जातो याचे सविस्तर वर्णन राजू शेट्टी यांनी समाज माध्यमातून करून या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.
राजू शेट्टी यांनी बुधवारी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांची लुबाडणूक करण्यात येत आहे. पुण्यातील संत तुकाराम महाराज लोहगांव विमानतळावरून दररोज जवळपास ३० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. पुणे येथील विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना ओला , उबेर यासह टॅक्सी संघटनांच्या गाड्या विमानतळावर पिक अप करण्यासाठी आल्यास प्रत्येक वाहनधारकाकडून जवळपास २०० ते ३०० रूपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे.
काल रात्री मी २ वाजता दिल्ली येथून पुणे विमानतळावर आल्यानंतर टॅक्सी बुकींग केल्यानंतर हा प्रकार मला निदर्शनास आला. पुणे विमानतळ ते शासकीय विश्रामग्रह हे अंतर ॲानलाईन केल्यानंतर ३५० ते ३७५ रूपये दाखवित होते. मात्र जर ओला , उबेर किंवा अन्य टॅक्सी संघटनांची वाहने विमानतळाच्या गेटवरून पिक अप करायचे असल्यास ६५० रूपये इतकी रक्कम आकारण्यात आली.
याबाबत मी विमानतळावर माहिती घेतली असता ओला , उबेर किंवा अन्य टॅक्सीधारक जर विमानतळावरील गेटवर प्रवाशांना पिक अप केल्यास शुल्क आकारणी करण्यात येते आणि हा शुल्क नको असेल व कमी दरात प्रवास करायचा असेल तर विमानतळाशेजारी असणाऱ्या एरोमॅाल वर जावे लागत असून विमानतळ ते एरोमॅाल हे जवळपास ६०० मीटर अंतर आहे.

विमानतळ प्राधिकरण यांच्या संगनमताने याठिकाणी मक्तेदारी निर्माण करून प्रवाशांना लुबाडण्याचा धंदा सुरू झाला. मुळातच सर्वच प्रवाशांच्याकडे असलेल्या बॅगा व साहित्य यामुळे ६०० मीटर चालणे शक्य नाही हे स्पष्ट होते. याकरिता प्राधिकरणाने अशा पध्दतीने प्रवाशांना जादा शुल्क लावून सर्रास लुट करत आहेत.
काल मी ज्या टॅक्सीने प्रवास केला त्या टॅक्सीचालकाच्या एकुण ६५० भाड्यापैकी मुळ ३७५ रुपये त्यांचे कंपनी भाडे झाले व २७५ रूपये टर्मिनल प्राधिकरण भाडे झाले. त्याबरोबरच टॅक्सी चालकांच्या ३७५ रूपयामधील २५ ते ३० टक्के म्हणजे १०० ते १२५ रूपये ओला , उबेर किंवा अन्य कंपन्या कपात करून घेतात. वरील भाड्यापैकी २५० ते २७५ रूपये संबंधित टॅक्सी मालकास मिळतात त्यापैकी ८० ते १०० रूपये पेट्रोल किंवा डिझेलचा खर्च होतो त्यानंतर राहिलेल्या १५० ते १७५ रूपयात गाडीचा मेंटनन्स , हप्ता , कर्जाचे व्याज , त्याचा पगार या सर्वांचा विचार केल्यास रात्रं अन दिवस मेहनत करून हा व्यवसाय कसा परवडत असेल हा विचार मनामध्ये आला.
एकीकडे विमानतळ प्राधिकरण एका प्रवाशांच्या पाठीमागे २७५ रूपये टर्मिनल भाडे मिळवते , ओला , उबेर यासारख्या कंपन्या एका प्रवाशा मागे २५ ते ३० टक्के कमिशन घेतात आणि दुसरीकडे वाहतूकदार मात्र उपेक्षितच राहतो. राज्यात अशा पध्दतीने खासगी कंत्राटी देवून जनतेची , प्रवाशी व टॅक्सी मालकांची दररोज लाखो रुपयांची राजरोसपणे लुबाडणूक केली जात आहे. पुणे विमानतळावर दररोज सरासरी ५ ते ७ हजार वाहनामधून प्रवाशांना विमानतळ गेटवरून पिकअप केले जाते म्हणजे दररोज १२ ते १५ लाख रुपयांचा दरोडा प्रवाशांच्या खिशावर टाकला जात आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
मी दिवसभर घेतलेल्या माहितीवरून या सर्व कंत्राटात राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून अनेक मंत्री , लोक प्रतिनिधी व अधिकारी यांचे हप्ते चालू असून अशा पध्दतीने जनतेची सरार्स लुट सुरू झाली आहे. वाहतूक व्यवसाय करणारेही या सर्व जाचाला व व्यवस्थेला कंटाळले आहेत. देशाचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मतदारसंघातील विमानतळावरच ही परिस्थिती असेल तर देशभरात काय परिस्थिती असणार आहे हे जाणून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुणे विमानतळास संत तुकाराम महाराजांचे नाव देवून विमानतळाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारून स्वतःला राज्यकर्ते म्हणून मिरविणारे हे आताच्या युगातील ठग आणि पेंढारी जनतेवर दिवसाढवळ्या सर्रास दरोडा टाकत आहेत, असा उल्लेख करून त्यांनी आपली पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांना केले आहे.
