सातारा पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव-खंडाळा परिसरात सेवा रस्त्यावरील (सर्व्हिस रोड) मोठमोठे खड्डे, अरुंद मार्ग आणि संततधार पावसामुळे आज सकाळपासूनच वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. खांबाटकी जुना टोलनाका ते पारगाव परिसरापर्यंत सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खंडाळा येथील जुन्या टोलनाका परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. मात्र, हा रस्ता अत्यंत अरुंद असून त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. त्यातच पावसाच्या रिपरिपीमुळे वाहनांचा वेग मंदावला असून आज सकाळपासूनच वाहतूक कासवगतीने सुरू आहे.
पारगाव बसस्थानकापासून खांबाटकी घाटाच्या दिशेने सुमारे अर्धा किलोमीटरच्या सेवा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे खड्डे केवळ मुरूम आणि माती टाकून तात्पुरते बुजवले जात आहेत. परंतु, पावसामुळे हा मुरूम वाहून जाऊन काही वेळातच खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांना या रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, पारगाव बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची अक्षरशः तारांबळ उडाली. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी सेवा रस्त्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे तिथेही वारंवार कोंडी निर्माण झाली.
त्यातच, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणीसह पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्याही आज सकाळपासून लक्षणीय वाढली आहे. परिणामी संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेकांना तासन्तास या महाकोंडीत अडकून राहावे लागले आहे. मागील दोन दिवसांपासून महामार्गावर हीच परिस्थिती आहे.
अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. व महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच सेवा रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी जोरदार मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कामकाजाबाबत v वारे खड्ड्यात आढळत असल्याने वाहनचालकांकडून व सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
