सातारा: सातारा-पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथे मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास झालेल्या एका अंत्यंत भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारी(MH १४ एल जे३०३३ ) वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली मोटार मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली आणि उडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकेमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला(KA २७ सी ५८७८) धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीचा चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात मावळ व कामशेत परिसरातील वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि तळेगाव दाभाडे येथील निखिल बाळू राऊत या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच अपघात असताना मदतीसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते.या घटनेमुळे मावळ आणि तळेगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
