सातारा: शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्या आणि नोकरदारांना आलेली सलग तीन दिवस सुटी यामुळे गावी किंवा पर्यटनस्थळांवर गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या वाहनांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आनेवाडी टोल नाक्यावर तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तर अन्यत्रही वाहतूक मंद गतीने पुढे सरकत होती.

महाराष्ट्र दिन (दि १ मे), शनिवार-रविवार आठवड्याची सुटी यामुळे सलग सुट्या आल्यामुळे तसेच सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी लागली असल्यामुळे पुण्या-मुंबईतील अनेक प्रवासी गावी किंवा पर्यटनस्थळांवर गेलेले आहेत. या प्रवाशांच्या परतीच्या वाहनांमुळे रविवार दुपारपासून पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली होती. विशेषत: आनेवाडी टोल नाक्यावर तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तर अन्यत्रही वाहतूक मंद गतीने पुढे सरकत होती.

कोल्हापूर-सातारा-आनेवाडी टोलनाका खंबाटकी घाट रस्त्यावर वाहनांची कोंडी मोठी होती. मुख्य महामार्ग, सेवा रस्ते वाहनांच्या या गर्दीत कोंडले होते. महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने या रस्त्यावरून बाहेर पडून मिळेल त्या मार्गाने वाहनधारकांनी आणि प्रवाशांनी पर्यायी रस्त्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे सातारा, वाठार स्टेशन, लोणंद, जेजुरी, सासवड या अन्य मार्गावरही मोठी कोंडी झाली.

महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येत असल्याने रस्त्याची व्यवस्था ही कोलमडून पडल्याचे दिसून येत होते. काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खंबाटकी घाट व बोगद्याजवळ अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती.

आनेवडी टोल नाक्यावर तर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. टोलनाक्यावरून वाहने पुढे जाण्यास उशीर होत असल्याने त्याचा परिणाम मागील वाहतुकीवरही झाला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. यातच कडक उन्हाळ्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. काही वाहनचालकांनी समाज माध्यमांवर चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारीत करत याबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. विशेषतः टोल नाके, घाट परिसर आणि अरुंद मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.

दरम्यान, पुढील काही दिवस सुट्या असल्याने वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ गृहीत धरण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक कोंडीमुळे खासगी बस, पर्यटक वाहने आणि मालवाहतूक वाहनांनाही फटका बसला. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागत होता. सध्या लग्नाचा मुहूर्त असल्याने वेळेवर लग्नाला, गावाकडच्या जत्रेला, अंत्यविधीला इतर कामांसाठी ठरलेल्या वेळी गावी पोहोचता येत नसल्याने प्रवासी, वाहन चालक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.