सातारा : उसाला प्रतिटन पहिली उचल ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दर ५०० रुपये मिळावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे (ता. सातारा) येथे तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या किनी येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शेतकरी रस्त्यावरच ठिय्या मांडून बसल्यामुळे सुरूच होते. शेतकऱ्यांनी महामार्गावरच जेवण उरकून आंदोलन सुरू ठेवल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
साखरेचे वाढलेले दर, इथेनॉल निर्मितीचे उत्पन्न आणि राज्य सहकारी बँकेने साखरेचे केलेले प्रतिक्विंटल ४,२०० रुपयांचे मूल्यांकन पाहता कारखानदारांनी ४,५०० रुपयांची पहिली उचल देणे सहज शक्य आहे. परंतु, प्रशासन आणि कारखानदार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. मात्र, ठोस निर्णयाशिवाय आंदोलन स्थगित करण्यास शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार देत प्रशासनाची विनंती धुडकावून लावली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी उद्याच्या बैठकीवर बहिष्काराची घोषणा केली आहे.
तब्बल १२ ते १५ महिने काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला घामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका प्रवक्ते अनिल पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी मांडली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्या तरी, आंदोलकांनी सामाजिक भान जपत तातडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेला तत्परतेने मार्ग मोकळा करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.
या आंदोलनात राजू शेळके, राजू केजळे, नंदकुमार नलवडे, अर्जुन साळुंखे, वसीम इनामदार, देवानंद पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सायंकाळी साताऱ्याचे तहसीलदार समीर यादव यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्याने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
पुण्याकडून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूरहून पुण्याकडे सर्व वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आंदोलकानी रात्री उशिरा महामार्गावरच जेवण केले आहे. महामार्गावर शेतकऱ्यांनी बैठक ठोकल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि ४)सकाळी अकरा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ऊस दराचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे अशी प्रशासनाने केलेली विनंती शेतकरी आंदोलकांनी धुडकाऊन लावली आहे. सर्व प्रतिनिधी आंदोलनावर ठाम आहेत.
