​सातारा: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सलग दुसऱ्या दिवशीही भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारच्या कोंडीनंतर प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत पाडण्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात आज परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पुन्हा एकदा खंबाटकी घाट आणि आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याने चालक आणि प्रवासी तासनतास चक्काजाममध्ये अडकून पडले आहेत.

​महामार्गावरील शिरवळ, खंडाळा ते थेट आनेवाडी टोलनाक्यापर्यंतचा पुढे सातारा परिसर गाड्यांच्या भल्यामोठ्या ताफ्याने ठप्प झाला आहे. घाटातील अवघड वळणे आणि सेवा रस्त्यावरही वाढलेली अतिक्रमणे यामुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या अन् अन्नाच्या तुटवड्यामुळे अतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत.

​खाजगी वाहने आणि ट्रॅव्हल्सची उघड लूट सुरूच

​स्वारगेट आणि कात्रज बस स्थानकांवर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. एसटीची पुरेशी उपलब्धता नसल्याने खाजगी ट्रॅव्हल्स आणि मोटार चालकांनी प्रवाशांच्या हतबलतेचा पूर्ण फायदा घेतला आहे. नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट दराने अवास्तव भाडेवसुली केली जात असून, पुणे ते सातारा आणि महाबळेश्वर प्रवासासाठी ६०० ते ८०० रुपयांपर्यंतची मनमानी आकारणी सुरू आहे.

​टोलमाफीच्या घोषणेचा फज्जा!

​शासनाने गणेशभक्तांसाठी जाहीर केलेल्या टोलमाफीची अंमलबजावणी आनेवाडी टोलनाक्यावर पूर्णपणे कोलमडली आहे. नाक्यावर टोलमुक्तीचे नियोजन कोलमडल्याने गाड्या थांबवून ठेवल्या जात आहेत, ज्यामुळे सुमारे २ ते ३ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. “शासनाने कागदावर टोलमाफी जाहीर केली, पण प्रत्यक्षात नाक्यावर अर्धातास अडकून पडावे लागत आहे. ही गणेशभक्तांची उघड फसवणूक आहे,” असा तीव्र संताप प्रवासी व्यक्त करत आहेत.दरम्यान, महामार्ग पोलिसांकडून भोर-मांढरदेवी-वाई या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र वाहनांचा प्रचंड ओघ पाहता हा दिलासा तुटपुंजा ठरत आहे.