कोल्हापूर : पुणे शिक्षक व पदवीधर या दोन्ही जागा भाजपकडे पूर्वीपासून आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर पक्षाचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, भाजपने यापूर्वी शिक्षक व पदवीधर या दोन्ही मतदारसंघात निवडणुका लढवलेल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच्या विरोधात विजयी झालेले होते. परंतु विजयी झालेल्या संपूर्ण लाड परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा कायम आहे.
शिक्षक मतदार संघात गेल्यावेळी भाजपने लढत दिली होती. येथे काँग्रेसचा विजय झाला असला तरी भाजपने लढत दिले असल्याने याही जागेवर भाजपचा दावा कायम आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक लढवतील, असा दावा त्यांनी केला.
गोकुळ दूध संघामध्ये महायुती म्हणून एकदिलाने लढणार आहोत. याबाबत कोठे धोका उत्पन्न होण्याचे कारण नाही. तालुका पातळीवर मतदान होणार असले तरी किंतु – परंतु उरलेले नाही. गोकुळ सारख्या मोठ्या संस्थेत प्रतिनिधित्व मिळावे ही भूमिका प्रत्येक पक्षाची राहिली आहे. थोड्या कालावधीत जे मतभेद आहेत ते संपुष्टात येतील, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
घटनाक्रम कसा राहिला?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत जागा वाटपाची स्पर्धा रंगली आहे. यामुळेच कोणाला किती जागा मिळणार यावरून दावे प्रति दावे सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात याबाबत चर्चेची आवर्तने पार पडले तरी त्यामध्ये एकमत घडू शकले नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आपल्या पक्षाला किती जागा मिळाल्या पाहिजेत ठराव किती याबाबतची वस्तुस्थिती कथन केली.
निवडणुकीच्या एकूण प्रवासा वेळी अडवणुकीचे धोरण कसे राबवले गेले याबाबत यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत आपला निर्णय कळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत ते अंतिम निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल असे सांगितले जात आहे.
या बैठकीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री विनय कोरे, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
जागावाटपात रस्सीखेच
चंद्रकांत पाटील यांनी भाजप साठी आठ जागांची तर मुश्रीफ यांनी दहा जागांची मागणी केली. अबीटकर यांनी शिवसेनेला आठ जागा मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. तर विनय कोरे यांनी दोन ऐवजी तीन जागा मिळण्याचा आग्रह धरला. एकूणच जागा वाटपाचे हक्क सांगतानाही रस्सीखेच दिसून आली.
