कोल्हापूर : पदवीधर मतदार संघाच्या राजकारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एक घनिष्ठ नातेसंबंध दुरावण्याची वेळ आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी गेले वर्षभर तयारी करीत असलेले कागलचे प्रताप उर्फ भैय्या माने यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे नेते, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यापासून फारकत घेतली आहे.

तर या तुटलेल्या संबंधाचा संदर्भ देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रताप माने यांची राजकीय साथ सुटली असल्याचे आज माध्यमांशी बोलताना कबूल केले. प्रताप माने हे आमच्या गटाचे सरसेनापती होते. परंतु त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यांना मी ही निवडणूक लढवू नका. पुढे राज्यपाल नियुक्त आमदार किंवा महामंडळ येथे संधी देता येईल असे समजावून सांगितले. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे आता प्रताप माने आणि आमची साथ कायमची सुटली आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. यामुळे गेली २५ वर्ष हसन मुश्रीफ यांच्यासोबत सातत्याने असणारे प्रताप माने हे आता यापुढे मुश्रीफ यांच्या सोबत राहणार नाही अशी एक नवीच राजकीय वाटचाल सुरू झाली आहे. यामुळे कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सावलीसारखे हसन मुश्रीफ यांच्यासोबत असलेले भय्या माने यांनी अखेर मुश्रीफांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय घेताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीत भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असलेल्या भय्या माने यांच्या उमेदवारीचा गुंता सुटत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता पसरली होती. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी करून निवडणूक लढवावी असा आग्रह समर्थकांकडून होत होता आणि वरिष्ठांना मतदार नोंदणीची आकडेवारी दाखवून अपक्ष किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगून महायुतीत मैत्रीपूर्ण लढत करावी अशा सूचना देखील मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. 

मात्र तरीही उमेदवारी निश्चित न झाल्याने भय्या माने यांनी कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधरची निवडणूक लढणारच असा निर्धार व्यक्त केला असून माझ्या राजकीय भविष्याच्या आड कोणी येऊ नये असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे, तर दुसरीकडे या बंडखोरीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील कठोर भूमिका घेतली असून मी भय्या माने यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत, महायुतीचा धर्म पाळत मला भाजपसोबत राहावे लागेल त्यामुळे आजपासून माझा आणि भय्या माने यांचा संबंध संपला असे जाहीर केले आहे.

दरम्यान भाजपकडून शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागा आपल्याकडेच राहणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला असून भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भय्या माने यांनी आपल्या प्रचारात शिवाजी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी ५० कोटींचा निधी मिळवून देण्यात आपली महत्त्वाची भूमिका असल्याचा पाढा वाचत सोशल मीडियावरून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.