सातारा:विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती आणि भाजपसाठी अत्यंत अनुकूल वातावरण असतानाही आलेला निकाल धक्कादायक ठरला असून, या निकालावर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “जनतेचा कौल आम्ही मोठ्या मनाने स्वीकारला असला, तरी महायुतीतील काही घटकांनी अंतर्गत गडबड केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल आणि ‘मौका सबको मिलता है’,असा थेट इशारा देत गोरे यांनी महायुतीतीलच मित्रपक्षांवर रोख साधला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा घालू!’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपकडून अभ्यासू उमेदवार स्मिता जाधव यांच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आली होती. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांना रिंगणात उतरवले होते.
या दोन्ही तगड्या उमेदवारांमुळे ही लढत अत्यंत ‘कांटे की टक्कर’ मानली जात होती. मात्र, अखेर हर्षदा देशमुख यांनी विजय मिळवत बाजी मारली.
या पराभवानंतर बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील अंतर्गत फुटीरतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “गेल्या वेळी आपण दोन्ही जागा गमावल्या होत्या, मात्र या वेळी एका जागेवर यश मिळाले आणि दुसऱ्या जागेवर अपयश आले. अत्यंत अनुकूल वातावरण असताना असा अनपेक्षित निकाल कसा आला, याची खात्री करून मूळ कारणांचा शोध घेतला जाईल. निवडणुकीत महायुतीच्या काही घटकांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे खरे आहे.
या संपूर्ण प्रकाराचा निश्चितच गंभीरपणे विचार केला जाईल.” गोरे यांनी पुढे बोलताना कुणाचेही थेट नाव न घेता महायुतीतील स्वकीयांवरच निशाणा साधला. “जे मोकाट सुटले आहेत, त्यांना लवकरच आळा घातला जाईल. वेळ सगळ्यांची येते, ‘मौका सबको मिलता है’,” असा सूचक इशारा त्यांनी दिल्याने सातारा व पुणे विभागातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या निकालाच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडकीस आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
