सातारा: स्वातंत्र्यदिन आणि वीकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे व मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांची महामार्गावर प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळपासूनच भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून आनेवाडी टोलनाका तसेच खंबाटकी घाट परिसरात वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

​सलग सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहनांची प्रचंड आवक झाली. परिणामी, महामार्गाची सहापदरी व्यवस्थाही अपुरी पडून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांना मोठा वेळ लागत असल्याने त्याचा फटका मागील संपूर्ण वाहतुकीला बसला आहे. खंबाटकी घाट, नवीन बोगदा परिसर आणि वेळे (ता. वाई) परिसरात वाहने ‘बंपर टू बंपर’ अडकली असून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

मुख्य महामार्गावर कोंडी झाल्याने अनेक वाहनधारकांनी सेवा रस्त्यांचा आश्रय घेतला, परंतु तेथील रस्तेही खचाखच भरले. महामार्गावरील गर्दी टाळण्यासाठी अनेक पुणेकरांनी सासवड, जेजुरी, लोणंद आणि वाठार स्टेशनमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांचा अवलंब केला.

प्रवाशांचा प्रशासनावर तीव्र संताप

महामार्गावरील खड्डे, संथ वाहतूक आणि टोलनाक्यांवरील नियोजनाचा अभाव यामुळे वेळेत गावी न पोहोचलेल्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी महामार्गावरील कोंडीचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

प्रशासनाचे आवाहन

वाहनांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. पुढील दोन दिवस ही गर्दी कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ गृहीत धरावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.