सातारा: गणेशोत्सवासाठी पुणे आणि मुंबईहून मूळ गावाकडे तसेच कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची पुणे-बंगळूर महामार्गावर तुफान गर्दी झाली आहे. खाजगी गाड्या, एसटी बस, मालवाहू ट्रक आणि इतर वाहनांची एकाच वेळी मोठी वर्दळ सुरू झाल्याने पुणे-सातारा-कोल्हापूर रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शिरवळ ते थेट खंबाटकी घाट आणि आगेनाडी टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गासह सेवा रस्त्यांवरही (सर्व्हिस रोड) वाहने ठप्प झाल्याने तासन् तास प्रवासात अडकलेले चालक व प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पुण्यातील स्वारगेट आणि इतर प्रमुख बस स्थानकांवर सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कराड आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची अलोट गर्दी उसळली आहे. एसटी गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. प्रवाशांच्या याच परिस्थीतीचा गैरफायदा घेत खाजगी गाड्या आणि ट्रॅव्हल्सचालकांनी भाड्यात मनमानी वाढ करत उघडपणे लूट सुरू केली आहे. सध्या पुणे ते सातारा ६०० रुपये, पुणे ते महाबळेश्वर ६०० रुपये, तर पुणे ते वाई प्रवासासाठी ३५० /४००रुपये इतकी अवास्तव मनमानी भाडे आकारणी केली आहे.
महामार्ग पोलिसांचे आवाहन आणि पर्यायी मार्ग
वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता खंडाळा, शिरवळ, सारोळा आणि भुईंज महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महामार्ग पोलिसांनी पुणे-मुंबईहून सातारा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांसाठी विशेष आवाहन जारी केले आहे. ”खंबाटकी घाट ते शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत प्रचंड कोंडी झाल्याने रस्ता मोकळा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, वाई व साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना भोर – मांढरदेवी – वाई मार्गे वळवण्यात येत आहे. मात्र, महामार्गावरील कोलमडलेले नियोजन आणि तुटपुंज्या प्रवासी सुविधांमुळे चाकरमान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गणेश भक्तांसाठी टोल माफीचा फज्जा
गणेश भक्तांसाठी शासनाच्या टोल माफीचा फज्जा उडाला आहे. टोलवसुली सुरू असल्याने आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची एक किलोमीटर पेक्षा वाहनांच्या रांगा लागल्याने व मोठी गर्दी झाल्याने त्या ठिकाणी वीस पंचवीस मिनिटे वाहनांना थांबावे लागत आहे.
शासनाने गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफी दिली आहे. मात्र शासकीय टोल माफीचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. सर्रास वाहने थांबवून टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे शासनाने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली टोल माफी म्हणजे गणेश भक्तांची मोठी फसवणूक असल्याची प्रतिक्रिया आशिष सावंत, सावंतवाडी यांनी लोकसत्ता ‘कडे व्यक्त केली.
