कोल्हापूर : पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी निवडणूक लढणार असल्याचे या पक्षाच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ असल्याने या मतदारसंघातील शिंदे सेनेचे मंत्री, खासदार ,आमदार, पदाधिकारी प्रचारात सक्रिय होत आहेत. रविवारी कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे चिवटे यांनी स्पष्ट केले.

पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अनेक प्रमुख उमेदवारांमुळे चर्चेत येऊ लागली आहे. नुकतेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांना पुणे येथे एका मोठ्या शिक्षक संघटनेने पाठिंबा दर्शवला. तर आज एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने मंगेश चिमटे यांना पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ यांनी येथे जाहीर केले. या संघटनेचे राज्यात २३ हजार शिक्षक सदस्य असून त्यापैकी पुणे मतदार संघात १५ हजार सदस्य असल्याचा दावा अडसूळ यांनी केला.

दरम्यान आपल्या उमेदवारी बाबत मंगेश चिवटे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय पक्षाचे काम अतिशय सक्षमपणे पार पाडले. माझे शिक्षण एम.ए. बीएड झाले असून बारामती येथे काही काळ अध्यापन केले आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील बरेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे येत्या १ एप्रिल पासून शाळांचा टप्पा वाढ अनुदान सुरू होणार आहे. तसेच, धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच योजनेअंतर्गत शिक्षक व कुटुंबीयांवर मोफत उपचार होणार आहेत. या योजनेबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सकारात्मक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी कोल्हापुरात आदर्श शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थित होणार आहे . यावेळी संघटनेचे सोलापूर अध्यक्ष वैभव शेटे,कोल्हापूर अध्यक्ष मिलिंद सनदी, प्रशांत साळोखे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

चिवटे यांच्या हालचाली

मिरज येथील एका कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदारांनी पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगेश चिवटे यांनी मागील काही काळापासून पुणे शिक्षक मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत शिक्षकांचे मेळावे आणि गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर, आरोग्य संदर्भातील मागण्यांवर आणि विमा योजनांच्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला असून, स्थानिक पातळीवर त्यांचा प्रचार सुरू आहे.