कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदार संघातून एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील, अशी स्पष्ट भूमिका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे रविवारी व्यक्त केली. तर, मंगेश चिवटे यांनी आपण मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या मतदारसंघात भाजपने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असली तरी महायुती अंतर्गत मतभेद ताणले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शिक्षक मतदार संघासाठी महायुती अंतर्गत जोरदार स्पर्धा सुरू होती. कौस्तुभ गावडे यांनी गेल्या आठवड्यात निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला होता. तर शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी पंधरा दिवसापासून प्रचाराची मोहीम उघडली आहे. त्यांनी पुणे शिक्षक मतदार संघातील सर्व पाच जिल्ह्यात मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे या दोघांपैकी उमेदवारीची चुरस रंगली होती. अखेर आज भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर महायुती अंतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.
याबाबत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील. भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.दरम्यान मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या मंगळवार,६ ऑक्टोंबर जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल करणार आहोत. एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो शिरसावंद्य आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तो मान्य आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचा मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. परंतु आमची मागणी होती की पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपला आणि शिक्षक मतदार संघ शिवसेनेला मिळावा. परंतु तसे झालेले नाही. शिक्षकांचा खूप मोठा आग्रह आहे, त्यांचे खूप मोठे समर्थन मला मिळत आहे.
गोकुळला महायुतीच – सामंत
कोल्हापुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि सतेज पाटील एका व्यासपीठावर एकत्र आलो होतो. परंतु गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. कदाचित आमच्या विरोधी आघाडीमध्ये सतेज पाटील असतील. संबंध राजकारणापुरते मर्यादित नसतात तर त्याच्या पलीकडे असतात. या संबंधामुळे आपल्या पक्षात बाधा येऊ नये ही आमची भूमिका असते, असे सामंत यांनी नमूद केले.
