सांगली : दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात रब्बीचे आवर्तन एक महिना अगोदर म्हणजे १५ नोव्हेंबरला सुरु करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी सांगलीत सांगितले.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले यावर्षी ६४ टक्के पाऊस झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे धरणावर प्रचंड ताण आला आहे. धरणातील उपलब्ध पाणी पुढील हंगामातील मान्सून पर्यंत पुरवावे लागेल. ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.

खरीप हंगामात अंतिम टप्प्यात पावसाने दडी मारल्याने रब्बीसाठी आवर्तन एक महिना अगोदर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढची ३ आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होतील. कोयना धरणातून गाळ काढला जाणार असून यासाठी जलसंपदा खात्याचकडून परवानगी दिली जाईल.

तीव्र उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होत आहे. सुपर एल निनो फेब्रुवारी मध्ये येईल असा अंदाज आहे. यानुसार धरणातील जलसाठा, पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गरज याचा विचार करावा लागेल. कोयनेतील ६५ टीएमसी पाणी वीजेसाठी आरक्षित आहे. त्यातील ३५ टीएमसी पाणी शेतीसाठी वळवण्याची मागणी असून शासन याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.

या बैठकीस पालक मंत्री चंद्रकांत पाटील,खासदार विशाल पाटील,जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे , डॉ.विश्वजीत कदम, सुधीर गाडगीळ,  गोपीचंद पडळकर, रोहित पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. साताऱ्याचे पालकमंत्री मंत्री शंभूराजे देसाई, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हाधिकारी दूर दृष्य प्रणिलीद्वारे बैठकीस उपस्थित होते‌ बैठकीत कृष्णा नदीवरील सिंचन प्रकल्प, टेंभू उपसा सिंचन योजना, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प , ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजना बाबत चर्चा झाली.