कोल्हापूर: राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याबाबत माहिती मिळण्यासाठी, त्यांच्या काही समस्या, तक्रारी निराकरण करण्यासाठी जलसंपदा अधिक्षक अभियंता कार्यालयामध्ये, कार्यकारी अभियंता कार्यालमयाध्ये हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे शुक्रवारी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, धैर्यशील माने आदी खासदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, जयंत पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अरुण लाड, सत्यजित देशमुख, राहुल आवाडे आदी आमदार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कालवा समितीचे सदस्य उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, कोल्हापूर इरिगेशन फेडरेशन आणि जलसंपदा विभाग यांनी पिण्याचे पाणी व खरीप रब्बी पिकांची आवर्तने यासाठी एकत्रित बसून समन्वयाने निर्णय घ्यावा. पहिली बैठक सोमवारीच घ्यावी. शहरांना पाणीपुवठा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. दर दोन महिन्यांनी मी स्वतः आढावा बैठक घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांना पाणी नियोजनाबाबत वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी कालवा निरीक्षकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत. यावर्षीच्या एकूण पाण्याचे नियोजन इरिगेशन फेडरेशन, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्रित घेवून समन्वयाने केले जाईल.
