कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, कोल्हापूरची जीवनदायिनी मानले जाणारे महत्त्वाचे राधानगरी धरण पूर्णपणे भरले आहे. धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजा उघडल्याने आणि अन्य धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक एक पहाटे सक्रिय झाला तर दुपारी तीन क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. धरणातून २००० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर परिसरातून पाण्याची आवक या ‘लक्ष्मी’ तलावात सुरू झाल्याने याची पाणी पातळी वाढतच राहिली. सातारा व कोल्हापूर परिसरातील धरणांमधूनही पाण्याचा सतत विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर सतत वाढ होत आहे.
३५ बंधारे पाण्याखाली
राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणीपातळी धोकादायक पातळीच्या दिशेने सरकत असून, प्रशासन प्रत्येक तासाला पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील ३५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणे भरू लागली
कोदे, सर्फनाला, जांबरे हे प्रकल्प १०० टक्के भरले असून कडवी ९६ टक्के भरला आहे. दूधगंगा धरणातील साठा ६६ टक्के झाला आहे. उर्वरित सर्व धरणे ८० टक्के भरली आहेत. पुढील महिन्याभरातील पावसात ती पूर्ण भरण्याची दाट शक्यता आहे.
गरजेनुसार पूरग्रस्तांचे स्थलांतर
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या बचावासाठी आणि मदतीसाठी पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत.नदीकाठच्या पूरबाधित गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरक्षित स्थळे आणि निवाऱ्यांची तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.
परिस्थितੀ नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आवश्यक तेथे लोकांचे स्थलांतर केले जाणार असून यासाठीची यंत्रणाही सज्ज असल्याचे राठोड यांनी नमूद केले.
