कराड : पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा खजिना मानल्या जाणाऱ्या राधानगरी वन्यजीव अरण्यामध्ये रायबा आणि सरदार या दोन प्रौढ नर वाघांच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद झाली आहे. पावलांचे ठसे, इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे ही ओळख निश्चित झाली असून, या दोन्ही वाघांच्या हालचालींवर वन खात्याकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

प्राथमिक निष्कर्षानुसार ‘रायबा’ (वन संकेत क्रमांक- एसटीआर-०७) व सरदार’ (एसटीआर-०८) हे दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून, ते स्वतंत्र क्षेत्रांमध्ये वावरत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. त्यांच्या अधिकृत अस्तित्वामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व राधानगरी परिसरात आता वाघांची संख्या नऊ झाली असून, त्यात सेनापती (टी १), सुभेदार (टी २), बाजी (टी ३), चंदा (टी ४), तारा (टी ५), हिरकणी (टी ६), रायबा (टी ७), सरदार (टी ८), शिलेदार (टी ९) या वाघांचा समावेश आहे.

राधानगरी परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन क्षेत्राचा भाग असून, सावंतवाडी– दोडामार्ग ते राधानगरी या वाघांच्या नैसर्गिक भ्रमणासाठी उपयुक्त मार्गामुळे वाघांना उत्तरेकडे स्थलांतर करणे सुलभ आहे. त्यांच्या प्रजातींचा टिकाव, जनुकीय विविधतेसाठी मोठी मदत होत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाढणारी वाघांची संख्या ही दीर्घकालीन संवर्धन धोरणांचे यश अधोरेखित करते.

वाघांच्या पाणवठ्यांचा वापर, निवासक्षेत्र, हालचालींचे मार्ग यांचा सखोल अभ्यास सुरू असल्याने भविष्यातील संवर्धन आराखड्याला दिशा मिळणार आहे. वाघांची वाढती संख्या, मजबूत वन्यजीव भ्रमणक्षेत्र आणि वैज्ञानिक व्यवस्थापनामुळे हा परिसर महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक म्हणून अधिक भक्कम ठरत आहे.

पर्यटनासाठी संधी

राधानगरी अभयारण्यात वाघांच्या अस्तित्वाची नोंद ही केवळ संवर्धनाची बाब नसून, पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधता, निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास यांमुळे हा परिसर पर्यावरणपूरक पर्यटनासाठी आकर्षण केंद्र ठरत आहे. पर्यटकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता वाढवून पर्यटनाला चालना दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठ्या फायद्याची संधी आहे.

वाघांची ही वाढती संख्या व्याघ्र प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. ‘रायबा’ आणि ‘सरदार’ हे या महत्त्वाच्या वन्यजीव भ्रमणक्षेत्राचे दुवे ठरत आहेत. – तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

सावंतवाडी- दोडामार्ग ते राधानगरी हा संपूर्ण पट्टा वाघांसाठी अतिशय चांगला भ्रमणमार्ग ठरला आहे. पुढे तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडला जात असल्याने वाघांच्या स्थलांतराला मोठी मदत होत आहे. – रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक