कोल्हापूर : शेती, शेती व्यवसाय याची पुरेशी माहिती नसते की वरवरची विधाने केली जातात. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी नेते हवेत गोळीबार करतात असे विधान करण्यापूर्वी शेतीचे नीट आकलन करून घ्यावे, असा सल्ला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे , अशी माहिती रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी भाजप सरकाराच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.
नरेंद्र – देवेंद्रमुळे कर्जात वाढ
ते म्हणाले, नरेंद्र आणि देवेंद्र इंद्राचे अवतार आहेत, म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज वाढत आहे. उत्पादनाला भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं कर्ज वाढत आहे. या सरकारने आदानी, अंबानी यांना पूरक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेतमजूर ग्रामीण, उद्योजक कर्जबाजारी होत चाललेत. सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे. अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.
इथेनॉल मध्ये पवार, गडकरींचा फायदा
केंद्र सरकारचे निर्यात धोरण चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. त्यासाठी निर्यात बंदी उठवली पाहिजे, तरच भारतीय शेतकरी सुखी होईल असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यासह इथेनॉल धोरणावर बोलताना सुद्धा त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत गडकरी आणि पवार घराण्याचा यामध्ये फायदा आहे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान असल्याचे त्यांनी सांगितले.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मानवी मृत्यू आणि शेतीच्या विनाशावर राष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करत तोकड्या मदतीचा विरोध करण्यात आला.गोवंशहत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्यांना जनावरे पाळणे अवघड होत आहे, असेही ते म्हणाले. वन्यप्राणी संरक्षण कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा रद्द झाला पाहिजे. निर्यात बंदी उठवली पाहिजे. संपूर्ण कर्ज, विज बिल मुक्ती, झालीच पाहिजे.
उसाला पहिला हप्ता सात हजार पाचशे प्रति टन मिळावा. साखर आणि इथेनॉल कारखान्यातील पंचवीस किलोमीटर अंतर रद्द करावा, अशा विविध मागण्या या परिसंवादात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, उपाध्यक्ष ज्योतीराम घोडके, बाळासो पाटील, डॉ. प्रगती खरे – चव्हाण, गुणाजी शेलार, गणपत पाटील, एडवोकेट जयश्री सरीकर, अनिल जाधव, पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते.
