राही सरनोबतचा सुवर्णवेध; कोल्हापुरात आनंदोत्सव

क्रोएशिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णवेध घेतला.

राही सरनोबतने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर सरनोबत कुटुंबीयांनी असा आनंदोत्सव केला.

कोल्हापूर : क्रोएशिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णवेध घेतला. २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात तिने सुवर्णपदक मिळवल्यानंतर सरनोबत कुटुंबीयांनी सोमवारी घरी आनंदोत्सव साजरा केला.

राही सरनोबतची नेमबाजीतील कामगिरी सातत्याने उंचावतच आहे. यंदा दिल्लीत झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते, तर सांघिक गटात सुवर्णपदक मिळवले होते. १०  मीटर एअर पिस्तूल प्रकारात कास्य पदक मिळवले होते. त्यामुळे आज तिच्या आवडत्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये वैयक्तिक कामगिरी कशी होणार याचे कुटुंबीयांसह कोल्हापूरकरांनाही कुतूहल होते. सुरुवातीच्या फेरीत तिने मनू भाकर हिच्यासह पहिल्या आठ मध्ये स्थान मिळवल्याने कुतूहल वाढले होते.

सरनोबत कुटुंबीयांत आज सकाळपासून उत्साहाचे वारे होते. ती उज्ज्वल यश मिळवणार असा विश्वास कुटुंबीयांना होता. तिचा अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी आई प्रभा, वडील जीवन, भाऊ आदित्य, आजी वसुंधरा यांच्यासह काका— काकी तसेच काही आप्तेष्ट एकत्रित जमले होते. राहीची कामगिरी उंचावत जाई, तसा या सर्वांचा ऊर अभिमानाने भरून येत होता. तिने सुवर्णवेध घेतल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून आणि पेढे वाटून आनंद द्विगुणित केला. ‘या यशामुळे ती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवेल,’असा विश्वास वडील जीवन सरनोबत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. कोल्हापुरात समाज माध्यमातून राहीवर अभिनंदनाचा वर्षांव करण्यात आला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahi sarnobat suvarnvedh celebration in kolhapur ssh

ताज्या बातम्या