सांगली : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील दुष्काळी भागात शनिवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. तासगाव पूर्व भागात दमदार, तर कवठेमहांकाळ, जत तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाउस झाला. या पावसाने रब्बी हंगामाची पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर द्राक्ष बागांनाही वळीव स्वरूपाचा झालेला हा पाउस दिलासादायक ठरला आहे.

गेल्या चार दिवसाच्या तीव्र उकाड्यानंतर आज दुपारी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात दमदार पावसाने हजेरी लावली. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा तर कवठेमहांकाळ, जत मध्ये हलक्या स्वरूपाचा पाउस झाला. ढगांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाउस पडत होता. यामुळे रानात व रस्त्यावर पाणी वाहते झाले. मागील पावसाच्या ओलीवर काही शेतकर्‍यांनी किमान जनावरांसाठी चारा होईल या आशेने रब्बी ज्वारीची पेरणी केली असून सध्या ही पिके कोळपणीच्या अवस्थेत आहेत. मात्र, दिवसभराच्या तीव्र उन्हामुळे ही पीके करपू लागली असतानाच आज पाउस झाल्याने करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर उर्वरित रानात रब्बी पेरणीसाठी आजचा पाउस उपयुक्त ठरला  आहे.

दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या तासगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आज भर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावळज, मांजर्डे, बलगवडे आणि गौरगाव परिसरात सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तासगाव तालुक्याचा नुकताच दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा रब्बी हंगामावर केंद्रित झाल्या आहेत. मात्र, परतीच्या पावसानेही ओढ दिल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या आणि पिकांच्या वाढीसमोर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील रब्बी पेरणी केलेल्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे.

मात्र, केवळ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे तालुक्यतील दुष्काळी परिस्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पाण्याची तीव्र टंचाई, जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि पिकांसमोरील संकट कायम असल्याने आगामी काळात दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे आजच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.