कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने मंगळवारी व्यक्त केली. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून कोल्हापूरला ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.

सतर्कतेचा इशारा

पंचगंगा नदीसह अन्य नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या ग्गावातील ग्राम पंचायतींनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. करवीर, शिरोळ तालुक्यात अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंचगंगा इशारा पातळीकडे

आज दुपारी ४ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी २६फूट ६ इंच इतकी होती. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली. जिल्ह्यात पाण्याखालील बंधारे संख्या ३ वरून २० झाली आहे. सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे बर्की धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक गावातच अडकले होते. सर्व पन्नास पर्यटकांना  सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तर, पावसाचा जोर वाढल्याने वर्षां पर्यटन करण्यासाठी पर्यटकांची भटकंती सुरू आहे. पन्हाळय़ासह इतर गड, सुरक्षित धबधबे येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे.