सातारा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कुटुंबीयांसह महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा तीन दिवसांचा मुक्काम असणार आहे. हा दौरा पूर्णतः खासगी असल्याची माहिती मिळत आहे.
थंड हवामान, निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणामुळे ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक, सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेते भेट देतात. ठाकरे कुटुंबाचेही या ठिकाणाशी विशेष नाते राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्वर विशेष प्रिय होते आणि ते दरवर्षी येथे सहकुटुंब विश्रांतीसाठी येत असत. त्याच परंपरेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही वेळोवेळी येथे येत असतात. त्यांनी महाबळेश्वरमध्ये फेरफटका मारण्याचे अथवा क्षेत्र महाबळेश्वर व अन्य ठिकाणी जाण्याचे कोणतेही नियोजन पोलिसांना अद्याप मिळालेले नाही.
राज ठाकरे यांचीही महाबळेश्वरला येण्याची परंपरा असून, २०१८ मध्ये त्यांनी येथे मुक्काम करत श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले होते. तसेच मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला होता. त्यांच्या सध्याच्या भेटीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये, उत्साहाचे वातावरण असून, पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे तीन दिवसांच्या मुक्कामासाठी आले आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या दोघांची भेट होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाबळेश्वर येथे त्यांच्या सुरक्षेसाठी असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती वाईचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी दिली. दोघांचाही नक्की कार्यक्रम निश्चित नाही. मात्र, त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीही व त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेतली जात असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
