सोलापूर – महाराष्ट्राच्या राजकारणात घराणी, सत्ता आणि नातीगोती यांची गणिते नवी नसली, तरी सोलापूरच्या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उभा केलेला राजकीय पसारा सध्या संपूर्ण राज्यात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजन पाटील यांचे भाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मिळवलेल्या विजयानंतर पाटील घराण्यातील या अनोख्या राजकीय समीकरणाला पुन्हा नवी धार आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि एकाच वेळी विधिमंडळात पोहोचलेले चार आमदार भाचे, असा हा राजन पाटलांचा विस्तार सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सत्ताकारणात चांगलाच गाजत आहे.

गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत घरातीलच कारभारी…

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या राजन पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद आणि विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद भूषवत जिल्ह्याच्या सहकार तसेच स्थानिक राजकारणावर दीर्घकाळ आपले निर्विवाद वर्चस्व राखले. हीच सत्तेची सूत्रे त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडेही सोपवली आहेत. त्यांचे सुपुत्र विक्रांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळले, तर दुसरे सुपुत्र अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले असून ते सध्या सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटवर सक्रिय आहेत. याशिवाय, राजन पाटील यांच्या स्नुषा प्राजक्ता पाटील या अनगर नगरपंचायतीच्या थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत असल्याने, गावपातळीपासून ते जिल्ह्याच्या सत्तेपर्यंतची महत्त्वाची पदे आजही एकाच छताखाली नांदताना दिसतात.

मराठवाड्यातील नात्यांची जोड आणि विधिमंडळात चार भाचे

घरातील या भक्कम संस्थात्मक ताकदीला मराठवाड्यातील राजकीय नात्यांची मिळालेली जोड राजन पाटलांचे प्रभावक्षेत्र अधिक व्यापक करणारी ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या विजयामुळे राजन पाटलांचे तीन भाचे आणि एक भाचेजावई सध्या विधिमंडळात आमदार म्हणून कार्यरत आहेत. राजन पाटील यांच्या भगिनी शांतादेवी यांचे सुपुत्र डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आहेत, तर त्यांचे बंधू डॉ. प्रतापसिंह पाटील हे नुकतेच पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. दुसरीकडे, राजन पाटील यांच्या थोरल्या भगिनी शारदादेवी यांचे सुपुत्र विजयसिंह पंडित हे बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, त्यांचे बंधू अमरसिंह पंडित हेदेखील गेवराईचे माजी आमदार तथा विधानपरिषदेचे माजी सदस्य राहिले आहेत.

या कौटुंबिक ताकदीत आणखी एक भर म्हणजे, राजन पाटील यांच्या भगिनी कोकिळादेवी यांचे जावई व पाटील यांच्या त्यांच्या भाची स्मिता यांचे पती राजेश पाटील-विटेकर हे परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पाटील घराण्यातील विधिमंडळाची ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्यांची आहे. राजन पाटील यांचे वडील स्वर्गीय बाबुराव पाटील हे आमदार होते, स्वतः राजन पाटील तीन टर्म आमदार राहिले, तर त्यांचे भाऊजी (दाजी) शिवाजीराव पंडित हेसुद्धा आमदार आणि तत्कालीन राज्यमंत्री राहिलेले आहेत. विशेष म्हणजे राजन पाटील यांनी अलीकडच्या काळात भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला असला, तरी त्यांचे आमदार भाचे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विविध पक्षांत तितक्याच ताकदीने उभे आहेत. पक्षीय सीमा, राजकीय मतभेद आणि विचारसरणीच्या मर्यादा ओलांडून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारी ही कौटुंबिक चौकट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्षवेधी ठरत आहे.