कोल्हापूर : केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक महायुतीसोबत पण राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बुधवारी केली.जयसिंगपूर येथे आयोजित एका बैठकीवेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. या शहरात महायुतीमधील घटक पक्ष व व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता निश्चितपणे आणली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यास न करताना टीका केली. १५० झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर आणि मालमत्ता पत्रक मिळवून दिले आहे. भुयारी गटार योजना, सुधारित पाणीपुरवठा योजना, भूमिगत गॅस पाईपलाईन या कामांमुळे रस्ते खराब झाले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून, आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी स्वागत केले.

आमदार यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर नगरपालिकेसाठी २६ उमेदवार १ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. हे २७ उमेदवार महायुतीतील घटक पक्षांचे असतील. शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असणे गरजेचे असते. तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो, असेही त्यांनी सांगितले.अनिल उर्फ सावकार मादनाईक म्हणाले, जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी बोलताना भाजपाचे मिलिंद भिडे म्हणाले, महायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहरात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी असलम फरास, राजेंद्र आडके, ताराराणी आघाडीचे बजरंग खामकर, शीतल गतारे, अभिजीत भांदिगिरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील, माजी नगराध्यक्ष असलम फरास, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, सुनील मजलेकर, युवराज शहा, भाजपाचे शहराध्यक्ष रमेश यळगुडकर, राहुल बंडगर, दादासो पाटील चिंचवाडकर, राजेंद्र आडकर, संतोष खामकर, बाळासाहेब वगरे, सागर मादनाईक यांच्यासह महायुती, सर्व घटक पक्ष ताराराणी आघाडी आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.