कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पोस्टरला बुधवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी कोल्हापुरी चपलेने चोप दिला. अधिकाऱ्यांना चोपून काढू ही राजू शेट्टी यांची भाषा राक्षसी आहे. त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.
शक्तीपीठ महामार्ग बाबत शेतकरी बांधवांमध्ये राजू शेट्टी गैरसमज निर्माण करीत आहेत. जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना दरोडेखोर समजू चोप दिला जाईल अशी भाषा त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आज एकनाथ शिंदे शिवसेनेने हे आंदोलन येथे केले.
राजकीय पोळी भाजणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कहर केला असून, मोजणी साठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपून काढू ही भाषा राक्षसीच आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीना आमदार राजेश क्षीरसागर यांनी योग्य उत्तर दिले आहे. चौपून काढू या राक्षसी वक्तव्याचा शिवसेना जाहीर निषेध करत आहे.
आगामी काळात विकासाच्या कामांना विरोध करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी अशी राक्षसी वक्तव्ये केली, तर त्यांना कोल्हापुरात फिरू दिले जाणार नाही. शिवसेनेच्या वाघाचा पंजा त्यांना दाखविला जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजू शेट्टी यांच्या फोटोला कोल्हापुरी पायताण मारो आंदोलन करण्यात आले.
राजू शेट्टींना थेट सवाल आहे. तुम्ही २००९ ते २०१९ असे सलग १० वर्षे हातकणंगले लोकसभेचे खासदार होता. त्यापूर्वी आमदार होता, सत्तेत सहभागी होता. मग या १० वर्षात तुम्ही सत्तेची फळं काय चोखली? कोल्हापूर जिल्ह्यातील २५ हजार बेरोजगार तरुणांसाठी तुम्ही एकही नवीन एमआयडीसी आणली नाही. जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज एमआयडीसीचा विस्तार केला नाही. एकही मोठा कारखाना आणला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संसदेत तुम्ही किती वेळा भांडलात? केवळ आंदोलन आणि स्टंट यापलीकडे तुम्ही काय केले? सत्तेची फळं चोखण्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात. मग आज जो माणूस काम करतोय, त्याच्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार काय?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
शेतकरी बांधवामध्ये गैरसमज निर्माण करून स्वताचे हित साधायचेच काम राजू शेट्टी यांनी केल्याने शेतकरी बांधवांनीच त्यांना घरी बसविले आहे. सद्या त्यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नसल्याने त्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती निर्माण होत आहे. शक्तीपीठ महामार्ग होणार यात काडीमात्र शंका नाही. शेतकरी बांधवांचे कोणतेही नुकसान होणार नाही यास महायुती सरकार सक्षम आहे. पण, शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
शिवसेना नगरसेविका मंगल साळोखे, पूजा भोर, सुनंदा भोपळे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रणजित जाधव, किशोर घाटगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, अर्जुन आंबी, विजय जाधव, अनिल पाटील, धनाजी दळवी, गणेश रांगणेकर, अल्लाउद्दीन नाकाडे, विजय सावंत, अंकुश निपाणीकर, राजू पोवार, सुरेश माने, बाळासाहेब शेलार, रवींद्र शिंदे, रुपेश इंगवले, अविनाश कामते, क्रांतीकुमार पाटील, उमेश जाधव, राहुल चव्हाण, प्रदीप मोहिते, विनायक जाधव, सचिन क्षीरसागर, शुभम शिंदे, विपुल भंडारी, समरजित मोहिते आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
