कोल्हापूर : राज्यातील ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोंबर पासून सुरू झाला असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. ऊस दराचा तिढा कायम असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बऱ्याच कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. याबाबत कोल्हापुरात दोन वेळा पालकमंत्र्यांसोबत बैठक होऊनही निर्णय न झाल्याने मंगळवारपासून (३ नोव्हेंबर) किणी व नागठाणे येथे बेमुदत पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रति टन ४५०० रुपये दराची मागणी केली आहे. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत आठवड्याभरात दोनदा साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली. मात्र दराबाबत तोडगा न निघाल्याने कारखान्यांसमोर ऊस गाळपाचा पेच निर्माण झाला आहे.

बैठक बारगळली

यासंदर्भात आज शनिवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे संकेत काल देण्यात आले होते. परंतु, ही बैठक बारगळली. त्यामुळे राजू शेट्टी यांनी ऊसदराचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक दर मिळावा

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर भागात उसाला प्रति टन ३४५० ते ३६५० रुपये एफआरपी (उचित व लाभकारी मूल्य) देणार असे कारखानदार म्हणत असले तरी ते आम्हाला मान्य नाही. गतवर्षी एफआरपी अधिक १०० रुपये असा दर घेतला होता. तेव्हा साखरेचा दर प्रतिक्विंटल ३७०० रुपये होता गृहीत धरला होता. आता हा दर ४ हजार रुपये पेक्षाही पुढे गेला आहे. यामध्ये कारखान्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये अधिक मिळाले आहेत. ही रक्कम त्यांनी शेतकऱ्यांना द्यावी,अशी मागणी त्यांनी केली.

शेतकरीच दर ठरवतील

कारखानदार साखरेची विक्री ५१०० रुपये क्विंटल दराने प्रमाणे करतात. परंतु शेतकऱ्यांना उसाला प्रति टन ३५०० रुपये देतात. कारखानदारांची ही प्रवृत्ती चालू देणार नाही. शेतकऱ्यांच्या उसाची किंमत यावेळी शेतकरीच ठरवतील, असा इशारा त्यांनी दिला.

साखर साठ्याचा प्रश्न

कारखाने लवकर सुरू न झाल्यास दिवाळीत साखर साठा घटून उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

कर्नाटकात गाळप थंडावले

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कर्नाटकातील कारखाने अजूनही बंद आहेत, असे यावेळी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांनी सांगितले.